नागपूर: ओबीसी बांधवांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, सरकारने त्यांना वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसीमधून देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. सरकारने दबावाखाली येऊन ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर राज्यातील नव्हेतर देशातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा आज येथे देण्यात आला.
या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात प्राचार्य बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरु झाले. उपोषण आंदोलनात रविवारी नामदेवराव भुयारकर, राजाभाऊ चिकाटे, गणेश नाखले, राजेंद्र काकडे, वसंतराव राऊत, हेमंत गावंडे, केशव शास्त्री, चंद्रकांत हिंगे, राजू गोस्वामी, रंगराव गेचोडे सहभागी झाले होते. रविवारच्या ओबीसी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार प्रवीण दटके, नगरसेवक रमेश सिंगारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांची मागणी ओबीसींच्या आरक्षणाला नख लावणारी आहे, असे सांगितले. मराठाआरक्षणासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे स्पष्ट धोरण आहे. ओबीसींमध्ये आधीच साडेतीनशे जातींचा समावेश असून २७ टक्के मिळणारे आरक्षण अर्धवट आहे. यामुळे मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.