Nagpur News : आईच्या प्रेमाऐवजी कैदेतलं बालपण...तीन वर्ष सूर्यप्रकाशही न पाहिलेली दोन लेकरं, हृदय पिळवटून टाकणारी घटना
esakal September 02, 2025 11:45 AM

Rescue Operation Saves Two Children in Nagpur: मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका आईनेच आपल्या दोन मुलांना तीन वर्ष एका खोलीत कोंडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मध्ये हा प्रकार घडला आहे. या मुलांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांमध्ये एका सात वर्षांचा तर दुसऱ्या पाच वर्षांचा मुलगा आहे. हे दोघेही आपल्या आईसोबत नागपूरच्या वाडीतील लावा दाभा या गावात राहत होते. या दोघांनाही त्यांच्या ३३ वर्षीय मनोरुग्ण आईने तब्बल तीन वर्षांपासून घरात कोंडून ठेवलं होतं. या अमानवी कोंडवाड्यात त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.

महत्त्वाचे म्हणजे या मुलांनी गेली ३ वर्षी सुर्यप्रकाशदेखील बघितला नव्हता. अशातच परिसरातील एका अंगणवाडी सेविकेला या प्रकाराची माहिती मिळाली होती. तिने हा संपूर्ण प्रकार बालकल्याण समितीच्या सदस्यांना सांगितला. त्यानंतर या समितीने स्थानिक पोलिस तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही मुलांची सुटका केली.

या दोन्ही मुलांना आता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारिकरिता दाखल करण्यात आलं आहे. तर मनोरुग्ण आईला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही मुलं सध्या शरीराने कुपोषित आणि मनाने घाबरलेली आहेत. त्यांच्या प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.