भारताचा ऑल राऊंडर इरफान पठाण याने क्रिकेट जगतात वादाचा नांगर टाकला. हा नांगर जर फिरला तर टीम इंडियात गुणवत्तेवर निवड होते की चमचेगिरीवर असा सवाल तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. इरफान पठाण याने कॅप्टन कूल एम एस धोनी याच्यावर गंभीर आरोप केला आहे. आरोपांच्या या फेरीनंतर BCCI त्यावर काय प्रतिक्रिया देते, दस्तूरखुद्द धोनी या आरोपांवर काय रिॲक्ट होतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. एका डिजिटल वृत्तवाहिनीला दिलेली इरफान पठाणची मुलाखत सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ वाऱ्याच्या गतीने व्हायरल झाला आहे.
अगोदर कौतुक नंतर वादळ
या व्हिडिओत इरफान पठाण याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानुसार, 2004 मध्ये व्हीबी मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. गोलंदाजी करताना कोणताही चमत्कार त्याला दाखवता येत नव्हता. त्यावेळी धोनीने त्याला सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. फार काही चिंता न करण्याचा सल्ला दिला. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणताही युक्तीवाद अथवा वादविवाद न घालता शांत राहण्याचा सल्ला धोनीने त्याला दिला. आपल्याविषयी माध्यमांमध्ये काय छापून येते. त्यात कधी कधी तथ्य नसते. याकडे दुर्लक्ष करून आपल्या खेळावर लक्ष देण्याचा हा सल्ला होता.
ही आठवण काढतानाच इरफान पठाण याने आतापर्यंतचा सर्वात भेदक मारा केला. त्याने धोनीवर गंभीर आरोप केला. धोनी अगदी काही मोजक्याच खेळाडूंची बाजू लिलया उचलून धरायचा. ठराविक खेळाडूंनाच पसंती द्यायचा. त्याने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही. पण जे खेळाडू धोनीसाठी हुक्का भरायचे, त्यांना संघात अधिक संधी मिळत असल्याचा बॉम्ब पठाण याने टाकला. त्याच्या या स्फोटक दाव्यानं एकच वादळ उठलं आहे. जे खेळाडू त्याच्यासाठी हुक्का भरत नसत त्यांना धोनीची पसंती मिळत नसे, त्याचा पाठिंबा मिळत नसे असा दावा पठाण याने केला.
चाहत्यांमध्ये खळबळ
धोनी आणि पठाण यांच्यात आतापर्यंत सर्व चित्र आलबेल असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये यापूर्वी टोकाची भूमिका दिसली नाही. पण पठाण याने हा उल्लेख कोणत्या संबंधात केला यावरून सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. त्याने गंमतीत असे विधान केले की त्याने खरोखरच धोनीला दोषी ठरवले यावर क्रिकेट जगतात दोन गट पडले आहेत. काही जण पठाण याचे विधान हे प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हणत आहेत. तर काहींनी धोनीला दोष दिला आहे.