Pune fraud:'विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार'; विवाहविषयक संकेतस्थळावर झाली आेळख, छायाचित्रे व्हायरलची धमकी अन्..
esakal September 02, 2025 04:45 PM

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. समाज माध्यमात छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले.

याप्रकरणी एकावर खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला आणि शेंडगे यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली. शेंडगेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला.

महिलेला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला, तसेच तिची छायाचित्रे त्याने मोबाईलमध्ये काढली. त्यानंतर शेंडगेने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये काढलेली छायाचित्रे महिलेचे समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.