ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडला गेलेल्या दक्षिण आफ्रिकेने यजमानांविरुद्ध पहिल्याच एकदिवसीय सामन्यात धमाका केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात 2 सप्टेंबरला हेडिंग्ले लीड्समध्ये इंग्लंडला निम्मे षटकंही खेळून दिलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 24.3 ओव्हरमध्ये अवघ्या 131 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडची लीड्समधील ही दुसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. इंग्लंडचा या मैदानातील 93 ही निच्चांकी धावसंख्या आहे. इंग्लंडने 1975 साली निराशाजनक खेळी केली होती. त्यानंतर आता 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंडची याच मैदानात अशी दुर्दशा झालीय.
इंग्लंडसाठी ओपनर जेमी स्मिथ याने सर्वाधिक 54 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे इंग्लंडला 100 पार मजल मारता आली. मात्र इतर फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर शरणागती पत्कारली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता फलंदाज 132 धावांचं आव्हान किती झटपट पूर्ण करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने केलेल्या अर्धशतकी खेळीने इंग्लंडची लाज राखली. स्मिथच्या या खेळीमुळे इंग्लंडला तिहेरी आकडा गाठता आला. स्मिथने 48 बॉलमध्ये 54 रन्स केल्या. जेमीने या खेळीत 10 चौकार लगावले. अनुभवी फलंदाज जो रुट, बेन डकेट, कॅप्टन हॅरी ब्रूक, जोस बटलर यांनी घोर निराशा केली. या चोघांपैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. तर इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जोफ्रा आर्चर आला तसाच परत गेला. तर ब्रायडन कार्स नाबाद परतला.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याने इंग्लंडला झटपट गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. केशवने अवघ्या 33 बॉलमध्ये अर्थात 5.3 ओव्हरमध्ये 22 धावा देत इंग्लंडच्या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. वियान मुल्डर याने 7 ओव्हरमध्ये 4.70 च्या स्ट्राईक रेटने 33 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. तर लुंगी एन्गिडी आणि नांद्रे बर्गर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. तसेच दक्षिण आफ्रिकेने हॅरी ब्रूक याला रन आऊट केलं. ट्रिस्टन स्टब्स आणि रायन रिकेल्टन या दोघांनी हॅरीला रन आऊट करण्यात योगदान दिलं. दरम्यान आता दक्षिण आफ्रिका हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करुन विजयी सलामी देते? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.