Nashik News : आता एका व्हॉट्सॲप मेसेजवर मिळेल पोलिसांची मदत; 'रक्षक एआय' उपक्रम सुरू
esakal September 03, 2025 06:45 AM

नाशिक: जिल्ह्यातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या तत्काळ मदतीसाठी ‘रक्षक एआय’ ही नावीण्यपूर्ण प्रणाली सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांसह परजिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात येणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. रक्षक एआय उपक्रमाचे लोकार्पण जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन सुधारणा कृतिआराखड्यांतर्गत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून ‘रक्षक एआय’ हे संपर्कासाठीचे आधुनिक माध्यम बनविण्यात आले आहे. या रक्षक एआयचा ७०६६१००११२ व्हॉट्सॲप चॅपबॉटचा वापर करता येणार आहे.

अधीक्षक पाटील यांनी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलिस आणि नागरिक यांच्यात आधुनिक संपर्कासाठी ‘एआय’च्या माध्यमातून चॅटबॉट बनविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्रा. धनंजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सौरभ शिंदे, नीरज बावा, ओम निकम, श्रीनाथ कदम, यश वडनेरे यांनी ‘रक्षक एआय’ व्हॉट्सॲप चॅटबॉट तयार केले आहे.

रक्षक एआय व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे जिल्ह्यातील नागरिकांना पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांना पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांना रक्षक एआयच्या माध्यमातून संबंधित पोलिस ठाण्याची माहिती व प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. अपघाताची घटना, अवैध धंदे याचीही माहिती याद्वारे देता येईल.

एआय चॅटबॉक्समध्ये नागरिकांचे ठिकाण, वैयक्तिक सेवा, सुविधांची सुलभ यादी, गोपनीय तक्रार नोंद, जागरूकता मोहीम, बहुभाषिय सहाय्य, स्मार्ट सहाय्य, अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी अशा नऊ सुविधा आणि त्वरित प्रतिक्रियेचा समावेश आहे. याद्वारे नागरिकांना पोलिसांपर्यंत पोहोचता येऊल. त्यावर त्वरित उत्तरे व संपर्काची सुविधा उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपस्थित होते.

OBC Reservation : 'सरकारकडून लिखीत आश्वासनाशिवाय माघार नाही': ओबीसींचा एल्गार; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची उपोषण स्थळाला भेट

रक्षक एआय

७०६६१००११२ हा व्हॉट्सॲप क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करा

रक्षक एआय चॅटबॉट वापरण्यास सुलभ व सुरक्षात्मक

यावर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधता येतो

या क्रमांकावर ‘हाय’ केल्यानंतर भाषेचा पर्याय निवडा

पोलिस ठाणे निवडल्यानंतर हवी असलेली माहिती उपलब्ध होते

याद्वारे तक्रारी, सूचनांसह कायदेशीर मार्गदर्शनही

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.