यवतच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी वस्तूचे कुतूहल
esakal September 03, 2025 12:45 PM

यवत, ता. २ : येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी (ता. २) स्किल्स ऑन व्हील्स उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषद व लेंड अ हॅन्ड यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी ठिबक व तुषार सिंचन यंत्रणा, शेती उपयोगी अवजारे, इलेक्ट्रिक व अभियांत्रिकी वस्तू कुतूहलाने पाहून त्याची माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य रुजवित, त्यांना नित्य जीवनात आवश्यक असलेल्या कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने एक फिरती प्रयोगशाळा लेंड अ हॅन्ड ने तयार केली आहे. नित्य वापरातील वस्तू, हत्यारे अवजारे यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये नियोजनानुसार हा उपक्रम राबवला जात आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय दोरगे, मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, उपक्रम अधिकारी सुनील नवले, मार्गदर्शक कुणाल रावत, धनंजय चव्हाण, गणेश काळे आदी उपस्थित होते. उपशिक्षक मल्लीनाथ शिंगे यांनी सूत्रसंचालन केले, गणेश खेडेकर यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.