Irish Coffee History: कॉफी, व्हिस्की, साखर आणि क्रीमची अप्रतिम जादू; अशी घडली 'आयरिश कॉफी'ची कहाणी!
esakal September 04, 2025 11:45 PM

Irish Coffee Origin: अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या आयलँडची खासियत म्हणजे 'आयरिश कॉफी' आणि 'काळी बियर'. आयरिश कॉफी हे एक जगप्रसिद्ध पेय असून ते काळी कॉफी, व्हिस्की, साखर आणि व्हिप्ड क्रीम या चार घटकांपासून बनवली जाते. या पेयात कॉफीचा कडूपणा, साखरेचा गोडवा, व्हिस्कीचा गरमपणा आणि क्रीमचा थंडावा अनुभवायला मिळतो. अशी चवदार आयरिश कॉफी म्हणजे थंड हवामानासाठी एक उत्तम पेय मानले जाते.

या खास कॉफीबद्दल आयर्लंडमध्ये एक कहाणी सांगण्यात येते. त्यानुसार पूर्वी आयलँडमधील फॉयनेस या एअरपोर्टवरून अटलांटिक महासागराच्या पलीकडे जाणारी अनेक उड्डाणे होत असत. त्यामुळे त्या बेसचा उपयोग इंधन भरण्यासाठी आणि लांबचा प्रवास असल्यामुळे प्रवासी विश्रांती घेण्यासाठी करत असत. अशा प्रवाशांसाठी त्या एअरबेसवर रेस्टॉरंट, बार व निवासाची सोय करण्यात आली होती.

Russian Salad: मॉस्कोच्या हॉटेलमधून जगभर!शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही रूपांत लाजवाब ‘रशियन सॅलड’ची गोड कहाणी नक्की वाचा

एके दिवशी कडाक्याची थंडी पडली होती, तेव्हा तेथील रेस्टॉरंटमधील ज्यो नावाच्या शेफने तिथे आलेल्या प्रवाशांना थंडीपासून बचाव होण्यासाठी म्हणून कॉफी तयार करून दिली. प्रथम त्यानी साखर घालून कडक काळी कॉफी केली व त्यात उब येण्यासाठी व्हिस्की घातली. त्या कॉफीची चव बघितल्यावर ज्योच्या असे लक्षात आले, की तयार कॉफी खूप कडक व कडवट चवीची झाली आहे. तो कडवटपणा कमी करण्यासाठी ज्योने त्यात वरून व्हिप्ड क्रीम घातले. प्रवाशांनी बोचऱ्या थंडीत त्या वेगळ्या चवीच्या कॉफीचा आस्वाद घेतला व त्यांना ती खूप आवडली.

त्यांनी ज्योला विचारले, "तू तयार केलेली कॉफी ब्राझिलियन कॉफी आहे का?" त्यावर कट्टर आयरिश ज्यो रागावला. त्याने प्रवाशांना जरा जोरातच सांगितले, "ती अजिबात ब्राझिलियन कॉफी नाही व ती 'आयरिश कॉफी' आहे." अशा तन्हेने आयरिश कॉफी जन्माला आली व तेव्हापासून ती आयर्लंडमधील प्रमुख पेय बनली.

आयरिश कॉफी बनवताना काळ्या कॉफीत साखर घालून ती गरम केली जाते. गरम कॉफी ग्लासमध्ये ओतून त्यात व्हिस्की मिसळली जाते. कॉफी व व्हिस्कीच्या मिश्रणावर चमच्याच्या मागच्या बाजूने अगदी हलक्या हाताने व्हिप्ड क्रीम घातले जाते. क्रीमवरती कधी जायफळ पूड तर कधी इन्स्टंट कॉफी भुरभुरली जाते.

वरवर बघता आयरिश कॉफी बनवणे खूपच सोपे वाटते; पण उत्तम चवीची कॉफी जमण्यासाठी सर्व पदार्थ योग्य मापात घेणे अतीशय गरजेचे असते. त्यानुसार १२० मिली गरम व कडक काळी कॉफी, १ मोठा चमचा साखर, ६० मिली आयरिश व्हिस्की व २ मोठे चमचे व्हीप्ड क्रीम असे प्रमाण घेतले जाते. कॉफीत शक्यतो ब्राऊन शुगर वापरली जाते कारण त्याला किंचित कॅरॅमलसारखी चव असते व त्यामुळे कॉफीची लज्जत वाढते.

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अॅव्हकाडो सँडविच

आयरिश कॉफी नेहमी उंच दांड्याच्या ग्लासमधून सव्र्व्ह केली जाते. ग्लासमध्ये खाली काळ्या रंगाची कॉफी व त्यावर पांढऱ्या शुभ्र व्हिप्ड क्रीमचा चांगला दीड दोन इंच उंचीचा थर असे आयरिश कॉफीचे रूप असते. क्वचित क्रीमवर जायफळाची पूड भुरभुरली जाते. कॉफीबरोबर नेहमी एक स्ट्रॉ व एक लांब दांड्याचा चमचा दिला जातो. ही कॉफी प्यायची एक पद्धत असते व त्यानुसार ती चमच्याने ढवळून कधीही एकत्र केली जात नाही. व्हिप्ड क्रीममधून एक स्ट्रॉ ग्लासच्या तळापर्यंत जाऊ द्यायचा व तो स्ट्रॉ खाली-वर करत कॉफीचा एकेक लहानसा घोट घ्यायचा. ग्लासमधील कॉफी संपत आली, की राहिलेली थोडीशी कॉफी व क्रीम चमच्याने एकत्र करून शेवटचा घोट घ्यायचा.

दर वर्षी २५ जानेवारी रोजी आयलँडमध्ये राष्ट्रीय आयरिश कॉफी डे साजरा केला जातो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.