Dharmaraj Kadadi:'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी भाजपच्या वाटेवर'; काँग्रेसने हात सोडल्याने अडचणी, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला गळती
esakal September 07, 2025 08:45 AM

-प्रमिला चोरगी

सोलापूर: जिल्ह्यातील काँग्रेसला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे सत्ताधारी शिवसेनेत गेले. त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी हे भाजपच्या वाटेवर आहेत. खुद्द काडादी यांच्या मालकीच्या वृत्तपत्रानेच शुक्रवारी (ता. ५) हे वृत्त पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केले आहे. मात्र, त्या वृत्तपत्राचे संपादकही असलेल्या काडादी यांनी या वृत्ताबाबत कानावर हात ठेवले आहे.

Radhakrishna Vikhe-Patil: ग्रामपंचायतींमुळे महाराष्ट्राचा विकास : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील; विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी

विविध संस्थांचे आधारस्तंभ असलेले धर्मराज काडादी हे शांत, संयमी व सहनशील नेते म्हणून ओळखले जातात. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यावरुन भाजप नेत्यांशी सुरू झालेला त्यांचा संघर्ष गत लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला होता. काँग्रेसमध्ये असले तरी नेहमीच राजकीय संघर्षापासून चार हात दूर राहणारे काडादी यांनी तेव्हा भाजपवर उघड टीका केली होती. तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याविरोधात शड्डू ठोकत ते मैदानात उतरले होते. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार, शैक्षणिक, आरोग्य व धार्मिक आदी विविध क्षेत्रांद्वारे शहरासह ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देणाऱ्या काडादी यांच्या संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शुक्रवारच्या वृत्तात म्हटले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या विरोधी भूमिका आणि प्रत्यक्ष मैदानात उतरत दोन हात केल्यामुळे सत्ताधारी भाजपने त्यांच्या संस्थांबाबत असहकाराचे धोरण अवलंबले आहे. सरकारी मदतीविना संस्थांची आर्थिक स्थिती बिघडण्याची चिन्हे आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्ताधारी पक्षात जाण्याकडे कल वाढला आहे. शेकडो सभासद आणि कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर त्यांचा कौल घेऊन लोकहितासाठी ते हा निर्णय घेणार असल्याचे वृत्त त्यांच्या मालकीच्या वृत्तपत्राने दिले आहे.

मला सत्ता आणि राजकारणात रस नाही. सरकारच्या मदतीअभावी कारखान्यासह अनेक संस्था अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्या अडचणी सोडवायच्या असतील तर सत्तेपासून दूर राहण्यात कसलेच हित नाही. तर सत्तेतील कोणत्या पक्षात जायचे, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तशी कोणाशीही चर्चा झाली नाही. प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत मला कल्पना नाही.

- धर्मराज काडादी, मार्गदर्शक संचालक, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना, सोलापूर

Ahilyanagar fraud: 'नोकरीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक'; पोलिस ठाण्यात सहा जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसने हात सोडल्याने अडचणी

काँग्रेस पक्ष रुजवण्यात काडादी कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. तीन पिढ्या काँग्रेससोबत राहिल्या. धर्मराज काडादी यांनीही नेहमी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, त्यानंतर प्रणिती शिंदे यांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यात काडादी यांनी उघडलेल्या मोहिमेचा मोठा वाटा राहिला. त्यांच्याच विश्वासावर काडादी हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसने त्यांचा ‘हात’ सोडून मोठा घात केला. तेव्हापासून त्यांच्या अडचणींत भर पडत आहे. त्या दूर करून सबका विकास साधण्यासाठी ते भाजप का साथ देण्याच्या विचारात असल्याचे दिसते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.