Success Story: एकेकाळी गुरे राखणारी तरुणी बनली कलेक्टर, वाचा संघर्षाची कहाणी
Tv9 Marathi September 08, 2025 06:45 AM

भारतात सध्या हजारो विद्यार्था स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अधिकारी बनून समाजाची सेवा करायची असा या विद्यार्थ्यांचा हेतू आहे. यूपीएससी ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. त्यामुळे दरवर्षी मोजकेच विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. आतापर्यंत तुम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या संघर्षाची कशा वाचल्या असतील. ज्यांनी कठोर परिश्रम करून अशा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. आज आपण अशाच एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या तामिळनाडूतील सी वनमती यांची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. ज्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर आयएएस अधिकारी बनून लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लहानपणी आर्थिक अडचण

वनमती यांचा जन्म तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम शहरात झाला. वनमती यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. त्यांचे उत्पन्न जेमतेम होते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत होती. शाळेत असताना वनमती घरातील कामेही करत असत. शाळा सुटल्यानंतर, त्या घरी असणारी जनावरे, म्हशी चरण्यासाठी घेऊन जायच्या. तसेच छोटी मोठी कामे करून घरखर्चासाठी हातभार लावायच्या.

पालकांचा पाठिंबा

वनमती या 12 वी पास झाल्यानंतर नातेवाईकांनी पालकांवर लग्नासाठी दबाव आणला. मात्र वनमती यांनी लग्नाला स्पष्टपणे नकार देत, मला अभ्यास करायचा आहे असं सांगितलं. वनमतीला तिच्या पालकांनी पाठिंबा दिला आणि तिने कॉम्पुटर अॅप्लिकेशनमध्ये डिग्री घेतली. यामुळे तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला.

टीव्ही मालिकेतून मिळाली IAS बनण्याची प्रेरणा

वनमती यांना दोन घटनांमुळे IAS होण्याची प्रेरणा मिळाली. एकदा त्यांच्या गावाला एका महिला कलेक्टरने भेट दिली होती. त्यामुळे वनमती या प्रभावित झाल्या. तसेच ‘गंगा यमुना सरस्वती’ या टीव्ही मालिकेतील प्रमुख पात्र हे महिला आयएएस अधिकारी हे होते. हे पाहून वनमती यांना प्रेरणा मिळाली. यामुळे वनमती यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

वनमती यांनी कलेक्टर बनण्याता निर्णय घेतला मात्र यूपीएससी परीक्षा पास होणे तिच्यासाठी सोपं नव्हतं. वनमती पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचल्या होत्या मात्र त्यांना यश मिळाले नाही. पुढच्या की प्रयत्नांमध्येही त्यांनी प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्ये अडथळे आले. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. नोकरी करत असताना त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. इंडियन ओव्हरसीज बँकेत (आयओबी) असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांनी यूपीएससीची तयारी केली.

2015 मध्ये वनमती यांच्या कष्टायला यश आले. वनमती यांनी यूपीएससी परीक्षेत 152 वी रँक मिळवली. त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. मुंबईत काम केल्यानंतर आता त्या वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.