बाजारात लिंबूची आवक वाढली
ग्राहकांना दिलासा
डोंबिवली, ता. ३ (बातमीदार) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लिंबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात लिंबांची आवक चांगली झालेली आहे. याचा थेट फायदा ग्राहकांना मिळत असून सध्या लिंबांचे भाव ७० ते ८० रुपये किलो इतके असून एका किलोत १८ ते २० लिंबे मिळत आहेत. परिणामी, लिंबाचे भाव स्थिर असून उन्हाळ्यात जसे भाव गगनाला भिडतात तसा यंदा पावसात भाववाढीचा फटका ग्राहकांना बसलेला नाही.
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानले जाते. उन्हाळ्यात थंडपेय, सरबत, लिंबूपाणी यासाठी मोठ्या प्रमाणात लिंबाला मागणी असते; परंतु पावसाळ्यात ही मागणी घटते; मात्र यावर्षी उत्पादन भरपूर असल्यामुळे भाव कमी राहिले आहेत. लहान लिंबे दोन ते तीन रुपये, तर मोठे लिंबू पाच रुपयांपर्यंत विकले जात आहे.
पावसाळ्यात उत्पादन वाढले
उन्हाळ्यात लिंबाला अधिक मागणी असते, त्यामुळे भाव वाढलेले असतात; परंतु पावसाळ्यात मागणी तुलनेने कमी असल्याने जरी उत्पादन भरपूर असले तरी भावात घट झाली आहे. बाजारात सध्या लहान लिंबे दोन ते तीन रुपये, तर मोठ्या लिंबांना पाच रुपये भाव आहे.
वर्षभर मागणी
लिंबूविक्रेते रोहन गुप्ता म्हणाले, की उत्पादन वाढले आहे; पण सध्या मागणी कमी आहे, म्हणून भाव कमी आहेत; मात्र पुढील महिन्यात पुन्हा भाव वाढू शकतात. तर विक्रेते रघुवीर कदम यांनी म्हटले, की लिंबाची मागणी आता वर्षभर असते. प्रत्येक हॉटेल, स्टॉल, उपाहारगृहात जेवणात लिंबू दिले जातो, त्यामुळे मागणी सातत्याने असते.