काटेवाडी, ता. १ ः रेशीम शेती हे शाश्वत उत्पन्नाचा एक स्रोत आहे. केंद्र व राज्य सरकार मिळून रेशीम शेती अधिकाधिक व्यवसायभिमुख कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. आधुनिक पद्धतींचा अवलंब करून दर्जेदार रेशम उत्पादन कसे काढता येईल? यासाठी शास्त्रज्ञ व अधिकारी प्रयत्न करत आहेत. हे ज्ञान रेशीम उत्पादकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मेरा रेशम मेरा अभिमान’ हे अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती रिसर्च अँड एक्स्टेंशन सेंटर बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी दिली.
निरवांगी (ता. इंदापूर) येथे रेशम दिनानिमित्त सोमवारी (ता. १) ‘मेरा रेशम मेरा अभिमान’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमात रेशीम किड्यांमधील रोगनियंत्रण आणि तुतीच्या झाडांवरील किडींचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला. एकूण ५५ शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला. डॉ. राठोड यांनी रेशीम किड्यांमधील रोगांचे व्यवस्थापन आणि तुतीच्या झाडांवरील किडी व माइट्स यांच्यावर पर्यावरणपूरक नियंत्रण पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना रोगमुक्त रेशीम उत्पादनासाठी उपाययोजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत माहिती दिली.
पुणे येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी अनुदानाची माहिती दिली. तसेच, रेशीम किड्यांचे संगोपन अधिक प्रभावीपणे कसे करता येईल, याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेऊन रेशीम उद्योगाला चालना देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतांना आणि निरवांगी येथील चॉकी रिअरिंग सेंटरला भेट देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर तज्ज्ञांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळाले.