उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. 9 प्रमुख जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या पुरामुळे राज्यातील 1300 गावे पाण्याखाली गेली आहेत, तसेच वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
पंजाबमधील तरणकरण, अजनाला, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसते. उत्तर भारतातील डोंगराळ भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे पंजाबमधील सतलज, बियास आणि रावी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी रहिवासी भागात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत पंजाबमध्ये पुराच्या संबंधित घटनांमुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक मुके प्राणी पुरात वाहून गेले आहेत. अनेकांच्या डोळ्यासमोर जनावरे वाहून गेली मात्र ते त्यांना वाचवू शकले नाही.
पंजाबमधील या पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 94061 हेक्टरवरील पिकांना पुराचा फटका बसला आहे. मानसा येथे सर्वाधिक 17005 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर कपूरथळा येथे 14934 हेक्टर, तरणतारन 11883 हेक्टर, फिरोजपूर 11232 हेक्टर, पठाणकोट 2442 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पंजाबमध्ये यंदा 180 लाख मेट्रिक टन भात उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आता या पुरामुळे हा आकडा गाठणे जवळपास अशक्य झाले आहे.
प्रभावित लोकांसाठी छावण्यांची उभारणीपुराने प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पंजाब सरकाने 129 मदत छावण्या सुरु केल्या आहेत. याद्वारे लोकांना मदत केली जात आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 114 बोटी आणि एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफची 20 पथके बचावकार्यात व्यस्त आहेत. तसेच हवाई दल, नौदल आणि लष्कराचे कर्मचारीही बचावकार्य करत आहेत.