वडगाव निंबाळकर, ता. २ : ‘‘विद्यार्थ्यांमध्ये असलेली वक्तृत्वकला ही केवळ राजकीय नेतृत्वासाठी नसून आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असते. अधिकारी असो वा उद्योजक किंवा राजकारणी, नेतृत्वगुणांसाठी आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्व फार महत्त्वाचे आहे,’’ असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केले.
कोऱ्हाळे बुद्रूक (ता. बारामती) येथील नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वसंतराव पवार स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्यात मॉडेल स्कूल्स, सायन्स व थिंकिंग लॅब, कॉम्प्युटर, लायब्ररी यांसारख्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय समाजमंदिराचे शैक्षणिक केंद्रात रूपांतर करण्याचा उपक्रम राबवला जात असून आतापर्यंत ३०० समाजमंदिरांना वाचनालयाचे स्वरूप देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वाचनाची सोय सहज उपलब्ध होत आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, वाचनालयाचे अध्यक्ष सतीश खोमणे, सुनील भगत, नितीन शेंडे, रणजित मोरे, प्रदीपकुमार गिते, गटविकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते. दत्तात्रेय भोसले यांनी प्रास्ताविक, तर शैलजा साळवे यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे सचिव रघुनाथ शिर्के यांनी आभार मानले.