Nashik News : गुप्त ठिकाणच्या सीसीटीव्हीने पकडले सूत्रधार; जिलेटिन प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावर प्रश्नचिन्ह!
esakal September 03, 2025 06:45 AM

जुने नाशिक: नंदिनी नदीपात्रात स्फोटक जिलेटिन नळ्यांचा मोठा साठा रविवारी आढळून आला होता. समृद्धी महामार्ग कामातील खडी फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साठ्यातील नळ्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. समृद्धी मार्गाचा ठेका घेतलेल्या कंपनीतील उपठेकेदारासह दोघांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या २४ तासांत गुन्ह्याची उकल करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस असलेल्या नंदिनी नदीपात्राच्या काठावर रविवारी (ता. ३१) मुंबई नाका पोलिसांना स्फोटक जिलेटिन नळ्यांचा सुमारे तीन हजार ८०० नळ्यांचा साठा आढळून आला होता. निर्जनस्थळी साठा फेकण्यात आल्याने पोलिसांना तपासकार्यात अडचण येत होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी शोध घेत तिघा संशयितांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक छोटा हत्ती वाहन येत-जात असल्याचे आढळून आले.

त्या दिशेने मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने कारवाई करत छोटा हत्ती चालक रिहान शेख यास नानावली भागातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार याने संबंधित भंगार माल विल्हेवाट लावण्याचे काम दिले असल्याचे सांगितले. पथकाने माहितीच्या आधारे संशयित जाकीर अत्तार यास ताब्यात घेतले. त्याने कसारा येथील साल्वो स्फोटके व रसायने प्रा. लि. कंपनीचे अशोक कर्डक यांच्याकडून मालवाहू टेम्पोची मागील ॲल्युमिनियम बॉडी भंगार म्हणून खरेदी केली होती. ती कुलूपबंद होती. बॉडी तोडण्यासाठी घेतली असता, त्यात जिलेटिन नळ्या मिळून आल्या.

छोटा हत्ती चालक रिहान शेख याच्यासह भंगार दुकानातील कामगार दबीर अन्सारी यास विल्हेवाट लावण्यासाठी पाठवले होते, अशी माहिती आत्तार याच्या चौकशीत समोर आली. त्यावरून पोलिसांनी कसारा येथून संशयित अशोक कर्डक यास ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीत समृद्धी महामार्गाच्या कामातील दगड, खडी फोडण्यासाठी नळ्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही नळ्या विक्री केलेल्या टेम्पोच्या बॉडीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. परंतु कुलूप उघडले नसल्याने ते त्यातच राहून गेले.

त्यानंतर कंपनीमार्फत टेम्पोची बॉडी भंगार व्यावसायिकास विक्री केल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारे तीनही संशयितांच्या चौकशीतून गुन्ह्याची उकल झाली. शिवाय त्यात कुठल्याही प्रकारे घातपात करण्याचा प्रकार नसल्याचे तपासात उघड झाल्याचे राऊत यांनी सांगितले. यातील चौथा संशयित दबीर अन्सारी फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १ मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरूटे, सहायक निरीक्षक जितेंद्र वाघ, उपनिरीक्षक समद बेग, हवालदार देवीदास गाढवे, पोलिस शिपाई आकाश सोनवणे, गणेश बोरनारे, दीपक जगदाळे, अपसुंदे, अरुण होंडे, प्रवीण कुलचे, किरण संवत्सरकर यांनी कारवाई केली.

Solapur Ganja Case :'प्रवासी बॅगेत गांजा; ओरिसातील दोघे अटकेत', संशयितांना कोठडी; १७ किलो गांजासह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

समृद्धी महामार्गाच्या कामातील निष्काळजीपणा उघड

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ठेकेदारांनी वापरलेल्या जिलेटिन नळ्याच्या साठ्यातील स्पोटक नळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा, निष्काळजीपणे अशा पद्धतीने फेकण्यात आला होता. समृद्धी महामार्गाच्या कामात कशा पद्धतीने निष्काळजी होत होती, हे यातून उघड झाले आहे.

सीआरएस फंड कॅमेऱ्याची झाली मदत

सीआरएस फंड माध्यमातून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध कंपन्यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातीलच एक कॅमेरा परिसरात बसविण्यात आला होता. त्यात साठा फेकणारे कैद झाले होते. त्यामुळे गुन्हा उकल होण्यास मदत झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.