अफगाणिस्तानात भूकंपाने मोठी मनुष्यहानी झाली आहे. अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील जलालाबाद येथे आलेल्या शक्तीशाली भूकंपाने मरणाऱ्यांची संख्या वाढून 1400 हून अधिक झालेली आहे तर तीन हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 12 हजाराहून अधिक लोक या घटनेमुळे प्रभावित झाले आहेत.
अफगान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी एक्सवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. पूर्व अफगाणिस्तानात आलेल्या शक्तीशाली भूकंपात मरणाऱ्यांची संख्या आता 1,400 च्या पार गेली आहे. त्यांनी सांगितले की तीन हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जीवंत वाचलेल्या लोकांच्या शोधासाठी मदत कार्य सुरु आहे. अनेक लोक ढीगाऱ्याखाली असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
रविवारी रात्री उशीरा पर्वतीय क्षेत्रात आलेल्या 6.0 तीव्रतेच्या भूकंपाने अनेक गावेच्या गावे नष्ट झाली आहेत आणि लोक घरांच्या ढीगाऱ्यांखाली गाडले गेले आहेत. याआधी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ता युसूफ हम्माद यांनी सांगितले की जखमींना काढले जात आहे. त्यामुळे हे आकडे वाढू शकतो.
युसूफ हम्माद सांगितले की भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. या मार्गांना बंद केले होते. परंतू आता त्यांना उघडण्यात आले आहे.त्यामुळे भूकंपाच्या परिसरात अडकलेल्या लोकांना मदत पोहचवणे सोपे झाले असल्याचेही युसूफ हम्माद यांनी सांगितले.
भूकंपाने सर्वाधिक नुकसान कुनार प्रांतात झाले आहे. जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मदती करणाऱ्या यंत्रणांनी सांगितले की खडबडीत जमीन आणि तुटलेल्या रस्त्यांमुळे दुर्गम भागात पोहचण्यासाठी पायी प्रवास करावा लागत आहे.
तालिबानच्यावतीने जागतिक समुदायाकडे मदत मागण्यात आली आहे. ब्रिटनने दहा लाख पाऊंड ( 13 लाख अमेरिकन डॉलर ) ची आपात्कालिन मदत देण्याची घोषणा केली आहे.तालिबान सरकार ही मदत मानवी कार्य करणाऱ्या एजन्सींना देणार आहे. विशेष म्हणजे ब्रिटन सरकारने तालिबानला मान्यता दिलेली नाही.
चीनसह अनेक देशांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. साल 2021 मध्ये तालिबान सत्ते आल्यानंतर हा तिसरा मोठा भूकंप आहे आणि अफगाणिस्तानसाठी हे मोठे संकट आहे. मदतनिधीतील कपात आणि कमजोर अर्थव्यवस्थेमुळे तालिबान आधीच अडचणींचा सामना करत आहे.