मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची हाक दिली असून गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु आहे. आता मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला आता न्यायालयाच्या आदेशामुळे एक वेगळं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पण आंदोलकांनी मैदान सोडण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने नामवंत वकील सतिश माने शिंदे हे मैदानात उतरले आहेत. माने शिंदे हे उच्च न्यायालयात आंदोलनांची बाजू मांडत असून सुरुवातीलाच आंदोलकांकडून झालेल्या गैरकृत्याबद्दल न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.
मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याची तक्रार करणाऱ्या एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने आंदोलकांना तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसही कायद्यानुसार कारवाई करण्यास सांगितले. न्यायालयाच्या या आदेशानंतरही मराठा आंदोलकांनी आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
एपीएमसी मार्केटजवळ गाड्या लावाअनेक आंदोलकांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे पाटील यांनीही आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मैदानात एक प्रकारे संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. डीसीपी झोन १ चे प्रवीण मुंडे यांनी आझाद मैदान परिसरात येऊन आंदोलकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना त्यांच्या गाड्या एपीएमसी मार्केटजवळ लावण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या या सूचनांना काही आंदोलकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, पण काही आंदोलकांकडून आम्ही दादांचा (जरांगे पाटील) निर्णय मान्य करू असे सांगण्यात येत आहे.
आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीयावेळी पोलिसांकडून गाड्या काढल्या नाहीत तर कारवाई करावी लागेल, असे आवाहन केले जात आहे. तर आंदोलकांकडून आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितले आहे. यानंतर एका आंदोलकाने दादांनी कोर्टात जे सांगितलंय ते आता करा. आता वेगळं जे काही सांगितलं ते करा, त्यानंतर दादा तुम्हाला जो काही वेगळा निर्णय देतील तो देतील. आता तुम्ही स्वत निर्णय घेऊ नका. न्यायालयाने आपल्याला जे आदेश दिलेले आहेत, ते दादांनीही पाळा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की पोलीस ज्या काही सूचना देतात त्या पाळा. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे मुंबईतील सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
सध्या सीएसएमटी परिसराला छावणीचे रुप आले आहे. आझाद मैदानापासून सीएसएमटी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस, दंगल नियंत्रण पथक पाहायला मिळत आहे. मात्र मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाचा परिसर सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.