आशिया कप 2025 स्पर्धेला आता फक्त नि फक्त 1 आठवडा बाकी आहे. या बहुप्रतिक्षित टी 20 फॉर्मटने होणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. भारतीय संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. भारतासमोर यूएईचं आव्हान असणार आहे. त्यानंतर 14 स्पटेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. तर भारतीय संघ साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ओमान विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात भारताचाच एक दिग्गज टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहे.
ओमान क्रिकेट टीमचं आशिया कप स्पर्धेत यंदा पदार्पण होणार आहे. ओमानच्या कोचिंग स्टाफमध्ये एका दिग्गज भारतीयाचा समावेश आहे. सुलक्षण कुलकर्णी हे ओमानच्या कोचिंग टीममध्ये आहेत. सुलक्षण कुलकर्णी यांना कोचिंगचा दांडगा अनुभव आहे. सुलक्षण कुलकर्णी यांची जुलै महिन्यात ओमनाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
कुलकर्णी यांनी भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग क्रिकेट संघाने 2019 सालीवर्ल्ड कप जिंकला होता. कुलकर्णी यांनी मुंबईला क्रिकेट संघाला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. कुलकर्णी यांनी प्रशिक्षक म्हणून मुंबईला 2012-2013 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती. तसेच कुलकर्णी 2 हंगामांसाठी विदर्भाचे हेड कोच राहिले. तसेच कुलकर्णी यांना 2018 साली 1 महिन्यासाठी नेपाळच्या बॅटिंग कोचची जबाबदारी देण्यात आली होती.
सुलक्षण कुलकर्णी यांनी टीम इंडिया विरुद्ध ओमान सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली. “मी 10 वर्ष आरसीएफ क्लबचं नेतृत्व केलं. आम्ही टाइम्स शील्ड स्पर्धेत बहुतेक आठव्या स्थानी होतो. आमच्या संघात एकही मोठा खेळाडू नव्हता. आम्ही त्यानंतरही इंडियन आईल, एअर इंडिया, टाटा, एसीसी आणि अन्य संघांना पराभूत केलं होतं. या संघात तेव्हा भारतीय संघातील खेळाडू असूनही आम्ही जिंकलो होतो”, असं कुलकर्णी यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटंल.
“माझ्या नेतृत्वात आमच्या टीमने दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर आणि आघाडीच्या भारतीय फंलदाज असलेल्या प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं होतं. हा माझा दृष्टीकोन आहे. सर्वात कमजोर संघांपैकी एक असूनही आम्ही सामने जिंकले. तसेच ओमानच्या खेळाडूंनीही अशाच दृष्टीकोनाने भारत आणि पाकिस्तान विरुद्ध खेळावं असं मला अपेक्षित आहे”, असं कुलकर्णी यांनी नमूद केलं.