ओपनर एडन मारक्रम याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केलीय. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला एकदिवसीय सामना अवघ्या 20.5 ओव्हरमध्येच जिंकला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेलं 132 धावांचं आव्हान हे 125 चेंडूत 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 137 धावा केल्या. एडन मारक्रम आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने विजयात निर्णायक भूमिका बजावली.
एडन आणि रायन या दोघांनी स्फोटक सुरुवात केली. एडनने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूने रायनने एडनला चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने एडनच्या रुपात पहिली विकेट गमावली. एडनने 55 बॉलमध्ये 86 रन्स केल्या.एडनने या खेळीत 2 षटकार आणि 13 चौकार लगावले.
एडन आऊट झाल्यानंतर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला आणखी 2 झटपट झटके दिले. टेम्बा बावुमा 6 धावांवर बाद झाला.तर ट्रि्स्टन स्टब्स याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र रायन रिकेल्टन याने अखेरपर्यंत नाबाद राहत डेवाल्ड ब्रेव्हीस याच्यासह दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. रायनने 59 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तर डेवाल्डने 6 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडसाठी एकट्या आदील रशीद याने तिन्ही विकेट्स घेतल्या.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 24.3 ओव्हरमध्ये 131 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडसाठी जेमी ओव्हरटन याने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर इतरांनी गुडघे टेकले. जो रुट, हॅरी ब्रूक आणि जोस बटलर इंग्लंडचं हे त्रिकुटही दक्षिण आफ्रिकेसमोर फ्लॉप ठरलं. या तिघांपैकी एकालाही मोठी खेळी साकारुन इंग्लंडसाठी संकटमोचकाची भूमिका बजावता आली नाही. या तिघांनाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. बटलर, रुट आणि ब्रूक या तिघांनी अनुक्रमे 15,14 आणि 12 धावा केल्या. तर इतरांनाही मैदानात थोडा वेळही तग धरता आला नाही. केशव महाराज याने इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. केशवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वियान मुल्डर याने तिघांना बाद केलं. तर नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.