'इतरांचे उगीचच अनुकरण नको'
esakal September 03, 2025 04:45 AM

सायली संजीव

मला सगळ्यात जास्त आवडणारा पोशाख हा साडी म्हणजे साडी. याचं कारण एका स्त्रीचं रूप- मग ती महाराष्ट्रीयन असो भारतीय असो- तिचं रूप सगळ्यात जास्त साडीतच खुलून दिसतं, असं मला वाटतं. वेगवेगळ्या रंगाच्या, रचनेच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात. अख्या भारतभर वेगवेगळे हातमाग आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे मला साडी प्रचंड आवडते. साडीमध्ये अनेक वेगवेगळ्या रचना आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत, अजरक असतं, बांधणी आहे, ब्लॉक प्रिंटिंग आहे असे असंख्य प्रकार साडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

माझा फॅशन फंडा हा आहे, की कपडे आरामदायी असायला हवेत आणि अर्थातच साडीपेक्षा आणखी कंफर्टेबल काय असणार? तुम्हाला जर साडी पटकन नेसता यायला लागली, तर त्यासारखी आरामदायी गोष्ट कोणतीच नाहीये.

फॅशन करताना ही काळजी घ्यायला पाहिजे, की इतर लोकांसारखे ट्रेंडिंग कपडे घालताना तुम्हाला जर ते शोभत नसतील, सांभाळता येत नसतील, तर त्या ट्रेंड्सच्या मागे पळायला नको. आपल्याला जे आरामदायी वाटतं ते आपण घालायला हवं. ट्रेंड निघून गेला असला, तरी तुम्हाला ते कपडे परिधान करता आले पाहिजेत.

आत्ता आपण बघतो, की खूप पूर्वीच्या गोष्टी परत येतायेत. फुग्याच्या बाह्या असतील किंवा हाई वेस्टर्न जीन्स असतील -हे सगळ आधी होऊन गेलं आहे. काळजी एवढीच घ्यायची, की जरी ट्रेंड निघून गेला, तरी आपल्याला त्यात कंफर्टेबल वाटलं तर आपण ते केलं पाहिजे. उगाच ट्रेंडच्या मागे धावायला नको. सगळ्यांनी फॅशन बदलल्या म्हणून आपणही बदललं पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही.

माझ्यासाठी फॅशन आयकॉन अनेक लोक आहेत. एकाच व्यक्तीचं नाव घेता येणार नाही; पण सई ताम्हणकर माझा फॅशन आयकॉन आहे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ती ज्या पद्धतीनं आणि आत्मविश्वासानं सांभाळते ती प्रत्येक पोशाखात सुंदर दिसते. त्यामुळे ती माझी फॅशन आयकॉन आहे. साडीतही तितकीच खुलून दिसते आणि पाश्चात्य कपड्यातही तितकीच चांगली दिसते. ती दाखवून देते की वेगवेगळ्या स्टाइल सांभाळू शकते. ती केशरचनेतही अनेक वेगळे प्रकार करते. खूप जण ते करू लागले आहेत. आपणही त्यात छान दिसू शकतो. मला खरंच तिचं कौतुक वाटतं, की या सगळ्या गोष्टी ती सांभाळते.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.