Nashik News : सणासुदीच्या गर्दीसाठी रेल्वे सज्ज; नवरात्र-दिवाळीसाठी चालवणार हजारो 'पूजा विशेष' गाड्या
esakal September 03, 2025 05:45 AM

नाशिक रोड: २१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत नवरात्र, दसरा व दिवाळी या प्रमुख सणांचा हंगाम सुरू होत आहे. या दरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. वाढत्या मागणीचा विचार करून भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजारो विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ हजाराहून अधिक गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यास सुरुवात झाली आहे. या कालावधीत एकूण १५० पूजा विशेष गाड्या चालविण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, त्याद्वारे २०२४ अतिरिक्त फेऱ्या सुनिश्चित केल्या जाणार आहेत.

सणांच्या निमित्ताने देशभरातून प्रवाशांची सुरळीत हालचाल होऊन ते आपल्या कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करू शकतील, यासाठी रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे. उत्तर, पूर्व व दक्षिण भारतातील प्रमुख स्थानकांमधून धावणाऱ्या या गाड्यांमुळे महानगरांपासून ग्रामीण भागांपर्यंत उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. ‘पूजा विशेष’ मालिकेत दक्षिण मध्य रेल्वेकडून सर्वाधिक ४८ गाड्या चालवल्या जातील, ज्यामुळे ६८४ फेऱ्या पूर्ण होतील.

या गाड्या हैदराबाद, सिकंदराबाद व विजयवाडा येथून सुटतील. पूर्व मध्य रेल्वेने पाटणा, गया, दरभंगा व मुझफ्फरपूर मार्गावर १४ गाड्या अधिसूचित केल्या असून, त्या ५८८ फेऱ्या करतील. पूर्व रेल्वे कोलकता, सियालदह व हावडा येथून २४ विशेष गाड्या चालवेल, ज्याद्वारे १९८ फेऱ्या होतील.

Nature-rich Anuskura Ghat: निसर्गसंपन्न अणुस्कुरा घाटाचा विकास दुर्लक्षित; पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा शॉर्टकट, दुरुस्तीबाबत अनास्था

पश्चिम रेल्वेकडून मुंबई, सुरत व वडोदरा येथून २४ विशेष गाड्या चालवल्या जातील, ज्या २०४ फेऱ्या पूर्ण करतील. दक्षिण रेल्वेने चेन्नई, कोइम्बतूर व मदुराई येथून १० गाड्या नियोजित केल्या असून त्या ६६ फेऱ्या करतील. तसेच, पूर्व किनारपट्टी रेल्वे भुवनेश्वर, पुरी, संबळपूर; आग्नेय रेल्वे रांची, टाटानगर; उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज, कानपूर; आग्नेय मध्य रेल्वे बिलासपूर, रायपूर व पश्चिम मध्य रेल्वे भोपाळ, कोटा या स्थानकांवरून विशेष गाड्या सोडणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.