पारंपरिक गीतांच्या ‘रील्स’ची वाढतेय क्रेझ
तरुणाईचा फंडा ; गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः गणेशोत्सवातील आनंद सोशल मीडियाद्वारे अन्य सर्वांपुढे नेण्यासाठी सध्या तरुणाईकडून ‘रिल्स’ बनवण्यावर भर दिला गेला आहे. त्यातील विशेष करून माझ्या डोईवर भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नको, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या रिल्सना मोठी पसंती मिळत आहे.
चिपळूण तालुक्यात सध्या गणेशोत्सवाची जोरदार धामधूम सुरू असून जागरणासाठी बाल्या डान्ससह पारंपरिक गीतांनी संपूर्ण वातावरण सण उत्सवाचे चैतन्यमय निर्मिती झालेली पाहायला मिळत आहे. बाल्या नृत्यासह पारंपरिक गीतांनी त्यात विशेष भर पडलेल्या सोशल मीडियावरील कित्येक रिल्सच्या माध्यमातून घराघरातील अंगणासह सभा मंडपात तरुणाईसह वयोवृद्धदेखील ठेका धरत आहेत. त्यामध्ये सर्वात उंचांक गाठलेले रिल्स माझ्या डोईवर भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नको या गवळणसह, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण हे गजर, तसेच जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीमुळे गळा हार वाहून या ही पुष्प फुलेहे सुपरहिट ठरलेले गाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या या रिल्सचा मोठा गाजावाजा ऐकायला मिळत आहे. यासह सुपली सोन्याची सुपली सोन्याची या भोंडल्याची गाणी रिल्सला महिला वर्गाकडूनही पसंती मिळत आहे.
कुणी डोक्यावर ढोलकी घेऊन, तर कोणी पाणी बॉटल हातामध्ये घेऊन किंवा घरातील कोणतेही साहित्य ज्यामध्ये पातेले, टफ, बादली हातामध्ये घेऊन नाचवताना रिल्स बनवून आनंद द्विगुणित करत आहेत. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची वानवा असताना देखील ब्लूटूथ स्पीकरच्या माध्यमातून रिल्स बनवून त्या नेटवर्क उपलब्ध होत असलेल्या विशेष जागी जाऊन अपलोड केल्या जात आहेत. काळानुरूप विज्ञानाने केलेल्या प्रगतीमध्ये अत्यंत गरजेचा बनलेला मोबाईल हा अगदीच जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.
चौकट
गणेशभक्तांमध्ये उत्साह
यंदा सात दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे गणेश भक्तांमध्ये अधिक उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहे. या दरम्यान जागरणाला विशेष महत्त्व दिले जात असून बाल्या नृत्यासह पारंपरिक गीतांनी भोवती फेर धरून ढोलकीच्या तालावर सुमधुर चाली मध्ये गाणी गायिली जात आहेत. यामध्ये विशेष आकर्षण सध्या ठरत आहे ते सोशल मीडियावर उपलब्ध होणाऱ्या आणि सऱ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या रिल्सने गाजावाजा केला आहे.