जाई, जुई, सोनटक्का
esakal September 04, 2025 02:45 AM

डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)

अशोककुमार सिंग (लखनौ)

फुलं म्हणजे निसर्गातल्या अनेक गुणधर्मांचा सुरेल सुसंवाद. या सुसंवादाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात ती पांढरी जाई, जुई अन् सोनटक्क्यासारखी सुवासिक फुलं. सर्व रंगीत फुलांच्या रंगांचा एकत्र मिसळून होणाऱ्या पांढऱ्या रंगाची ही फुलं अनेकदा अध्यात्माचं, शुद्धतेचं, निरागसतेचं आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रमुख मूलतत्त्वाचं दर्शन घडवतात. म्हणूनच की काय पांढरी सुवासिक फुलं म्हणजे प्रसन्नता आणि शांततेचं प्रतीक मानतात आणि ती प्रामाणिकपणा आणि आदरही दर्शवतात.

पाच पवित्र पुष्प पंचामृतांपैकी जाईची पांढरं शुभ्र, सुवासिक फुले श्रीगणेशाच्या पूजनात ‘ॐ दक्षाध्यक्षाय नमः। जाई पुष्पं समर्पयामि’ म्हणून अर्पण करतात. याशिवाय हनुमान, महादेव आणि दुर्गामातेला आभूषणे परिधान करताना जाईच्या फुलांचे हार एक सुवासिक आभूषण चढविण्याचे उल्लेख ग्रंथांमध्ये आहेत. रामायण, महाभारतामध्ये जाईच्या वेली प्रासादाजवळ वाढवल्या जात असतं. त्याकाळच्या स्त्रिया गळ्यात आणि कानात जाईची ताजी फुलं आभूषणं म्हणूनच परिधान करत असत. चालुक्य, छोला, पल्लव राजघराण्यातली स्मारकं, शिल्पांमध्ये स्त्री, पुरुष यांनी जाईच्या फुलांच्या माळा घातल्याचे दिसते. कालिदासाच्या ‘शांकुंतलम्’मध्येही जाईचा उल्लेख आहे.

जाईला जातिका, जास्मिन, चंबाली, चंबेली, चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा अशी नावं आहेत. पण जाई आणि चमेलीच्या फुलांमध्ये फरक आहे. जाईच्या पाकळ्या पाच आणि ठसठशीत असतात, तर चमेलीच्या पाकळ्या पाचापेक्षा जास्त आणि नाजूक असतात. जाईचं फूल म्हणजे देवाची देणगी म्हणून जाईला ‘यास्मीन’ असे ही नाव आहे, तर वनस्पतिशास्त्रात जाई ‘जास्मिनम् ग्रँडीफ्लोरम’ म्हणून ओळखली जाते. तर आयुर्वेदातल्या चरकसंहितेमध्ये नवमल्लिका शित-भिरू अशी नावं आहेत. उष्णतेने तोंडात फोड आल्यास जाईची पानं दाताखाली दाबून ठेवतात. जाईच्या फुलापासून जे तेल काढतात ते मसाज करण्यासाठी, शांत झोप येण्यासाठी डोक्याला लावतात.

उत्तर प्रदेशातल्या कनौजमध्ये जाईच्या फुलांपासून अत्तर काढतात. जाईचा सुवास मुख्यत्त्वेकरून बेन्झील ॲसिटेटमुळे येतो. ज्यामुळे गोड आणि आल्हाददायक सुगंध येतो. याशिवाय बेन्झील बेन्झोएट, लिनालूल, टर्पिन्स, फायटॉल, लॅक्टोन्स अशा काही रसायनांच्या मिश्रणामुळे जाईला आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अत्तराला सुगंधाची समृद्धता येते. त्यामुळे ध्यानधारणा करताना मन एकाग्र होतं.

जाईच्या कुळातल्या जुईची पांढरी शुभ्र चांदणीसारखी फुलं रात्रीच्या अंधारात तर चमकतातच परंतु त्यांचा सुगंध मन प्रसन्न करणारा असतो. जुईला अम्बष्ठा, मुग्धी, सूचिमल्लीका आणि जास्मिनम् ऑरिक्युलॅटम् अशी अनेक नावं आहेत. जाईपेक्षा जुईची फुलं अतिशय नाजूक असतात. त्यांच्यात aलिनालूल आणि इन्डोलचे प्रमाण जास्त असल्यामुळे जुईचा वास जाईपेक्षा जास्त चांगला, मंद परंतु आल्हाददायक येतो.

अभिजात नाजूक लावण्य अन् स्वर्गीय सुवास अनुभवावा तो पावसाळ्यात फुलणाऱ्या सोनटक्क्याच्या फुलांमध्ये. प्राचीन भारतात या फुलाला पवित्र मानलं आहे. महाभारतात या फुलाचा उल्लेख आहे. पांचालीची (द्रौपदीला) इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमाने दैवी, ईश्वरी सुगंध असलेला सोनटक्का ‘कल्याणसौंगधिका’ म्हणून तिला दिला.

दोलनचम्पा, सुरुलि सुगंधी, गुलबकावली, व्हाईट जिंजर लिली, हेडिचियम् कोरोनारियम् अशी अनेक नावं असलेला सोनटक्का त्याच्यात असलेल्या मोनोटर्पीन्स, युकॅलिप्टॉल, लिनालूल अशा अनेक रासायनिक घटकांमुळे सुगंधी होतो. फूल उमललं की त्याच्या वासाने उत्साह येतो. त्यामुळे सोनटक्क्याचं फूल आध्यात्मिक क्षेत्राचं प्रवेशद्वार समजतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.