‘तामनाळे’मधील कॉजवेसाठी २५ लाख
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः तालुक्यातील तामनाळे येथील स्वयंभू रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर कॉजवे उभारण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी २५ लाखांचा निधी मंजूर केलेला आहे.
तामनाळे येथे रामेश्वर मंदिर आहे. त्या लगत एक मोठा नाला आहे त्याचबरोबर या गावातील ५० टक्के शेती ही या नाल्यापलीकडे आहे. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन सरपंच कै. तानाजी गिडये यांच्या मागणीनुसार माजी आमदार कै. मामी भुवड यांच्या प्रयत्नाने माजी बांधकाममंत्री जगन्नाथ जाधव यांनी लोखंडी फूटब्रिज मंजूर केला. त्यामुळे या गावातील लोकांची समस्या दूर झाली आहे. ४० वर्षांपूर्वी झालेला हा लोखंडी साकव गेली पाच ते सहा वर्षे नादुरूस्त होता. गेली तीन वर्षे या साकवावर ग्रामस्थ श्रमदानातून लाकडी साकव टाकून ये-जा करत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी हुमणे गुरूजी यांनी गेली पाच वर्षे प्रयत्न केले; परंतु यश मिळाले नाही. याबाबत चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्याकडे मंदिराकडे जाणाऱ्या ३०० मीटर अपूर्ण रस्ता व हा रस्ता डांबरीकरण या तीन कामाची मागणी केली होती. त्यानुसार कॉजवेसाठी आमदार निकम यांनी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. आमदार निकम यांनी ही लोकांची समस्या दूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.