ज्याला अटक केली, त्याच्या मृत्यूनंतर थडग्यावर जाऊन जपानी पोलिसांनी माफी का मागितली?
BBC Marathi September 04, 2025 02:45 AM
JijiPress via Getty Images

एका व्यावसायिकाच्या थडग्यावर जपानी अधिकारी नतमस्तक झाले. माफी मागत त्यांनी थडग्यावर फुलंही अर्पण केली.

या मृत व्यावसायिकावर एक औद्योगिक मशीन बेकायदेशीरपणे निर्यात केल्याचे खोटे आरोप पोलिसांकडून करण्यात आले होते.

पोलिसांनी मागितलेल्या माफीचा स्वीकार करण्यासाठी शिझुओ यांचे कुटुंबीय योकोहामा इथल्या त्यांच्या थडग्यापाशी जमले होते. मात्र, खोटे आरोप लावण्यामागे ज्याचा हात आहे त्याला माफ करू शकत नाही, असं शिझुओ यांच्या पत्नीनं म्हटलं.

हे सगळं सुरू झालं शिझुओ काम करतात त्या ओहकावारा काकोहकी या कंपनीच्या द्रव्य पदार्थांचं पावडरमध्ये रुपांतरण करू शकणाऱ्या स्प्रे ड्रायर्स या मशिनपासून. या मशिन्सचा वापर काही हत्यारं बनवण्यासाठी लष्करी दलांकडून केला जाऊ शकतो.

कंपनी या मशिन्सची बेकायदेशीर निर्यात करत असल्याचे आरोप केले गेले. त्यासाठी शिझुओ आईशिमा यांच्यासह कंपनीतील तिघा जणांना मार्च 2020 मध्ये अटक करण्यात आलं.

तुरूंगातून जामिनावर बाहेर येण्यासाठी आईशिमा यांनी आठ वेळा अर्ज केला. पण प्रत्येकवेळी त्यांचा जामीन रद्द झाला.

अशातच फेब्रुवारी 2021 मध्ये शिझुओ यांचा पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्यानंतर 5 महिन्यांनी त्यांच्यावरचे आरोपही रद्द झाले.

निर्यातीसाठीचे कायदे आमच्या कंपनीवर लागू होत नाहीत, असा युक्तीवाद यावेळी कंपनीने केला होता. म्हणजे, कंपनी करत असलेली निर्यात बेकायदेशीर नव्हती. त्यामुळे, खरंतर खटला दाखल करण्याचीही गरज नव्हती.

त्यामुळे आरोपींनी गुन्हा केला आहे की नाही याबद्दल शंका असल्याचं म्हणत जुलै 2021 मध्ये खटला बंद करण्यात आला.

पण पुढे सप्टेंबर 2021 मध्ये आईशिमा यांच्या कंपनीनं टोकियोच्या न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. शिझुओ यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचं न्यायालयानं सांगितलं आणि नुकसान भरपाई म्हणून 16.6 कोटी यीन म्हणजेच 11.2 लाख डॉलर्स भरण्याचे आदेश दिले.

JijiPress via Getty Images

"गरज नसताना अटकेचे आदेश दिल्यामुळे आणि खटला भरल्यामुळे आईशिमा यांच्या मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन झालं. जामीन नाकारला गेल्यानं त्यांना वैद्यकीय उपचारही घेता आले नाहीत. या सगळ्यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो," असं फिर्यादी हिरोशी इचिकावा यांनी म्हटलं.

नुकसान भरपाई करण्याच्या कोर्टाच्या आदेशाविरोधात टोकियोच्या मेट्रोपोलिटन पोलिस विभागानं आणि टोकियो जिल्हा सार्वजनिक फिर्यादी कार्यालयानं वरच्या न्यायालयात आव्हान दिलं नाही. यावर्षी 11 जूनला हा निकाल अंतिम म्हणून घोषित केला गेला.

चुकीचे आरोप का केले गेले, याचाही शोध घेतला गेला.

पण ज्यांच्यावर चुकीचे आरोप केले गेले त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, नेमकी चूक कुठे झाली हे पोलिसांना अजूनही ओळखता आलेलं नाही.

शिवाय, पोलिसांना मिळालेली शिक्षाही फार साधी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • जपानमधील अणुबॉम्ब हल्ल्याचे बळी ठरलेले कोरियन नागरिक आणि जखमांचं ओझं घेऊन जगणारी त्यांची पिढी
  • Ghibli ट्रेंड ज्यांच्या चित्रांमुळे सुरू झाला, त्या शैलीचे निर्माते हायाओ मियाझाकी यांच्याविषयी जाणून घ्या
  • लोक या माणसाला 'काहीही न करण्याचे' पैसे देतात
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.