- ratchl३२.jpg-
२५N८९१९५
रूपेश घाग
चिपळूण प्रभारी तालुकाध्यक्षपदी घाग
शिंदे शिवसेना ; आगामी निवडणुकीत लाभ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः येथील शिवसेना चिपळूण तालुका गुहागर विधानसभा मतदार संघ प्रभारी तालुकाध्यक्षपदी दहिवलीचे माजी सरपंच रूपेश घाग यांची निवड करण्यात आली. ते माजी आमदार व उपनेते सदानंद चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. एक वर्षाच्या कालावधीसाठी शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी घाग यांना निवडीचे पत्र दिले आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत शिवसेनेत उठाव केला. त्यांच्यासोबत राज्यातील विविध भागातील आमदार गेले. त्यानंतर काही महिन्यात माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही शिंदेगटाची कास धरली. त्यांच्या सोबतीला ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही गेले. सुरुवातीच्या कालावधीत चिपळूण तालुका गुहागर विधानसभा मतदार संघाच्या तालुकाप्रमुखपदी माजी उपसभापती शरद शिगवण यांना संधी देण्यात आली; मात्र काही महिन्यापूर्वी त्यांनी शिंदेगटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत शिगवण यांनी प्रवेशदेखील केला. तेव्हापासून शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी सरपंच रूपेश घाग हे चिपळूण तालुक्यातील गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या गावांत जोरदार सक्रिय झाले होते. शरद शिगवण यांच्या जाण्याने या भागात मोठा परिणाम झाला नाही. घाग हे सुरुवातीपासून शिवसेनेत सक्रिय असून, माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक राहिले आहेत. घाग यांच्याकडे चांगले संघटन कौशल्य आहेत. त्यामुळे पक्षाला त्यांचा आगामी निवडणुकीत लाभ होणार आहे.