नवी दिल्ली : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 26 लाख लाभार्थ्यांबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून डेटा मिळाला आहे. त्यासंदर्भातील स्क्रुटिनीचं काम सुरु आहे. 35 ते 40 टक्के काम पूर्ण झालं असून राहिलेलं 50 ते 60 टक्के काम येत्या 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विविध प्रश्नांची उत्तरं दिली. त्या म्हणाल्या, 28 जून 2024 रोजी योजनेची घोषणा करण्यात आली.1 जुलै 2024 पासून नोंदणी सुरु करण्यात आली होती. ऑक्टोबरपर्यंत नोंदणी 2 कोटी 63 लाख पेक्षा जास्त होती.
महिला व बालविकास विभागाकडे कृषी, सामाजिक न्याय, माहिती तंत्रज्ञान यांच्या डेटाचा एक्सेस असण्याचं कारण नव्हतं. इतर विभागाकडून विनंती करुन डेटा घ्यावा लागतो, त्यानुसार विनंती करण्यात आली. अन्न व नागरी पुरवठासह सर्व विभागाकडून माहिती मिळाली, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
डिसेंबर जानेवारीला नमो शेतकरीचा डेटा मिळाला होता. सुरुवातीपासून लाडकी बहीणचे निकष आहेत त्यात नमूद केलं होतं. नमो शेतकरीचा लाभ 1000 रुपये दिला जातो त्यामुळं लाडकी बहीणचा 500 रुपये मिळणं अपेक्षित आहे. नमो शेतकरीचा डेटा मिळाल्यानंतर त्यानुसार बदल केले.माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून 26 लाख महिलांचा डेटा मिळाला. 2 कोटी 63 लाख अर्जांपैकी सुरुवातीला 2 कोटी 47 लाख अर्जदार राहिले म्हणजे स्क्रुटिनी केली होती, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
26 लाखांचा डेटा जनरल डेटा आहे. एखाद्या महिलेनं बँक खातं नसल्यानं घरातील कुणाचं तरी बँक खातं दिलं असू शकतं. त्याची ग्राऊंड लेव्हल स्क्र्टिनी होणं गरजेचं आहे. आमचं 35-40 टक्के काम झालंय, 50-60 टक्के काम 10 दिवसात होणं अपेक्षित आहे. नक्की आकडा किती ते लक्षात येईल. सरकारी कर्मचारी महिलांनी पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून चलनाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत पैसे जमा होणार आहेत. 26 लाख अर्जदार महिलांसंदर्भात स्क्रुटिनी झाल्यानंतर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून काम स्क्रुटिनीचं काम सुरु आहे. असं आदिती तटकरे म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 13 महिन्यांची रक्कम मिळालेली आहे.
आणखी वाचा