मंदिर फोडणारा चोरटा गजाआड
दानपेटीतील रकमेसह एक लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : शहरातील गावदेवी माता मंदिरात चोरीची घटना घडली होती. मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम तसेच इतर किमती ऐवज चोरी केला होता. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अवघ्या चार तासांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संभाजी राम बिराजदार (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख ३७ हजार ९१५ रुपये किमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव येथील गावदेवी मंदिरात मंगळवारी (ता. २) रात्री साडेबाराच्या सुमारास चोरीची घटना घडली होती. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश करून दानपेटीचे लॉक तोडून त्यातील रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात मनीष म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखत रामनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अच्चुत मुपडे, पोलिस उपनिरिक्षक प्रसाद चव्हाण, पोलिस हवालदार मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन सांगळे, राहूल मेंगडे, नीलेश पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.
तांत्रिक तपास
मंदिर परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती रिक्षातून तेथे आलेला व मंदिरात गेल्याचे निदर्शनास आले. मंदिरातील सीसीटीव्हीत सदर तरुण मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैशांची चोरी करतानाची घटना कैद झाली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्तहेरांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानुसार तुकाराम नगरमध्ये त्याच्या राहत्या घराच्या जवळ पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, चोरीला गेलेली ३७ हजार ५१८ रुपये किमतीच्या भारतीय चलनी नोटा व नाणी असा एकूण एक लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कर्ज फेडण्यासाठी संभाजी याने ही चोरी केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली असून, पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.