रत्नागिरीत १८पर्यंत
मनाई आदेश
रत्नागिरी ः जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश जाहीर करण्यात आल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. गणेशोत्सव ६ सप्टेंबरपर्यंत आणि ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. त्यामुळे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
‘वंदे मातरम’च्या
वर्धापनदिनी लोगो स्पर्धा
रत्नागिरी ः वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त भारतमातेच्या स्तुतीचा गौरवदिन साजरा होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिकसुद्धा देण्यात येणार आहे. सोबतचा क्युआर कोड अथवा लिंकला भेट देऊन आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकता. प्रतिसाद पाठवण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर आहे, असे आवाहन प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.
आरोग्य शिबिरात
७० रुग्णांची तपासणी
चिपळूण ः येथील आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पिंपळी बुद्रुक (पेढांबे ब्रीज) येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात रक्तगट तपासणी, शूगर, ब्लडप्रेशर आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या उपक्रमाचा परिसरातील सुमारे ७० रुग्णांनी लाभ घेतला. ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्येच खरी धन्यता, आनंद व परमार्थ आहे, असे मत ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. वर्षा कुडचडकर यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुडचडकर, ॲड. सर्जेराव सोळांकुरे, नितेश खाडे, मयुरी सावंत, माहेश्वरी जाधव, आदिती सुवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बेलदार समाज कार्यकारिणी संघ (चिपळूण) गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील मोहिते, उपाध्यक्ष अजित पवार व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह विक्रम मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
भोगाळेतील सार्वजनिक
गणपतीचे उद्या विसर्जन
चिपळूण ः शहरातील भोगाळे येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने माधव सभागृहात सुरू असलेल्या गणेशोत्सवात बुधवारी रंगारंग अभिनय स्पर्धा उत्साहात झाली. मंडळाच्या ७४व्या वर्षातील या गणेशोत्सवात पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी आणि महाविद्यालयीन तसेच खुला गट अशा तीन विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे संयोजन ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ कार्ले यांनी केले होते. परीक्षक म्हणून अजय यादव आणि मंगेश डोंगरे यांनी काम पाहिले. परीक्षकांच्या हस्ते श्री गणरायाला श्रीफळ अर्पण करून स्पर्धेची सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता स्नेहवर्धिनी महिला मंडळ यांचा नाट्यनृत्य कलाविष्कार रंगला. गुरूवारी सकाळी १० वाजता बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली तर दुपारी २ वाजता महिलांसाठी खास रानभाज्यांचे पदार्थ या विषयावर पाककला स्पर्धा पार पडली. सायंकाळी कात्यायनी महिला मंडळाचे जागर शक्तीचा हा कार्यक्रम रंगतदार झाला. शुक्रवारी (ता. ५) श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी साडेपाच वाजता गणेश गौरव पुरस्कार व विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. रात्री ९ वाजता संगीत भजन सहेली महिला ग्रुप कलाविष्कार सादर करणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी दिली.