कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही ९ प्रतिनिधी: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती नवरा राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रसिद्ध उद्योगपती दिपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी शिल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दिपक कोठारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुमारे एक दशकापूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडून 60 कोटी रुपये घेतले होते. या जोडप्याने त्यांचा व्यवसाय वाढवण्याचे आश्वासन दिले होते आणि याच कामासाठी दोन हप्त्यांमध्ये 60 कोटींचे पेमेंट केले गेले होते. कोठारी यांनी आरोप केला की, पैसे घेतल्यानंतर या दोघांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही भूमिका बजावली नाही आणि सर्व पैसे त्यांनी वैयक्तिक वापरासाठी खर्च केले.
वाचा: भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान मुंबईत तासभर का थांबवले? पुण्याला जाण्याची का हवी होती परवानगी?
काय आहे संपूर्ण वाद?
कोठारी यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, 2015 मध्ये शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी एका मध्यस्थामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि 75 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चर्चा केली. हे पैसे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने घेतले गेले, जी लाइफस्टाइल उत्पादनांना प्रोत्साहन देते आणि एक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवते. या कर्जासाठी 12 टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते.
कर्जाचे गुंतवणुकीत रूपांतर
कोठारी यांनी सांगितले की, नंतर शेट्टी आणि कुंद्रा यांनी त्यांना कर्जाचे गुंतवणुकीत रूपांतर करण्याची विनंती केली आणि दरमहा व्याजासह मुद्दल परत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये शेअर सब्स्क्रिप्शन कराराद्वारे 31.95 कोटी रुपये हस्तांतरित केले, तर सप्टेंबरमध्ये पुन्हा सप्लिमेंट कराराद्वारे 28.53 कोटी रुपये हस्तांतरित केले. हे सर्व फंड बेस्ट डील टीव्हीच्या बँक खात्यात पाठवले गेले. नंतर या जोडप्याने त्यांचे पैसे परत केले नाहीत आणि सर्व प्रयत्नांनंतरही आजपर्यंत ते परत केले गेले नाहीत. त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही आणि माझ्या फंडाचा गैरवापर केला. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.