Satara Crime: 'मोबाईल चोरांची टोळी अटकेत'; साताऱ्यातील चोऱ्या उघड, मोबाईलसह चारचाकी जप्त
esakal September 04, 2025 01:45 PM

सातारा: सातारा शहराच्या विविध भागांत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय पाच चोरट्यांच्या टोळीस शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून चोरलेले १२ मोबाईल आणि चारचाकी असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Manoj Jarange-Patil: राजेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम: मनोज जरांगे-पाटील; सातारा गॅझेटियरची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंकडे

सातारा शहर परिसरात रविवारी गौरी आगमनासाठीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी शहराच्या विविध भागांतून आठ नागरिकांचे आठ मोबाईल हँडसेट चोरले होते. याच्या सात तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या होत्या. या चोरीचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना दिल्या होत्या.

यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक कुमार ढेरे व इतर कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी नेमले होते. या पथकास भूविकास बँक चौकात एक चारचाकी थांबल्याचे दिसले. त्यास थांबण्याचा इशारा केल्यानंतर ते वाहन वेगाने वाढे फाटा परिसराकडे निघून गेले. यामुळे वाहनाचा पाठलाग करत ते पोलिसांनी वाढे फाटा येथे पकडले.

चारचाकीत असणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. या वेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी चारचाकीची झडती घेतली. यात त्यांना १२ मोबाईल हँडसेट सापडले.

OBC Community Organization: 'लोणंदमध्ये गुरुवारपासून साखळी उपोषण'; ओबीसी समाज संघटनेचा इशारा; मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये

चौकशीत संशयितांनी जगदीश रामप्रसाद महंतो, अजितकुमार सुरेश मंडल, रोहितकुमार सियाराम महंतो, अर्जुन राजेश मंडल (सर्व रा. सहाबगंज, झारखंड), शोयेब मस्तानसाहेब शेख (रा. नांदेड) अशी नावे सांगितली. त्यांना अटक करत पोलिसांनी सोबत असणाऱ्या अल्पवयीनास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.