मयूर कॉलनी - शिवतीर्थनगर, कोथरूड येथील रहिवासी नंदकिशोर मुळीक (वय ६५) यांनी सिंहगडावर तब्बल एक हजार वेळा पायी (ट्रेक) जाण्याचा विक्रम केला आहे. मुळीक यांनी २००५ पासून आठवड्यातून एकदा सिंहगडावर पायी जाण्याची सुरुवात केली. यावर्षी (ता. २८ ऑगस्ट) त्यांनी आपला ‘एक हजारावा’ ट्रेक पूर्ण केला.
मुळीक यांचे वडील दत्तात्रेय मुळीक हे दररोज १४ किलोमीटर पायी चालायचे. वडिलांच्या प्रेरणेने नंदकिशोर यांनीही नियमित चालण्यास सुरुवात केली. त्यांच्या परिचयातील दामु काका माटे हे सिंहगडावर पायी जात असत. पहिल्यांदा त्यांच्या सोबत सिंहगडावर गेले असता माटे यांनी मिठाई दिल्याची आठवण मुळीक यांनी सांगितली.
आठवड्यातून एकदा अशा प्रकारे मुळीक वर्षभरात सुमारे ५० वेळा सिंहगड वारी करतात. पहाटे पाच वाजता कोथरूड येथून आतकरवाडी (सिंहगड पायथा) येथे जातात. सकाळी सहा वाजता चढाई सुरू करून साधारण सात वाजेपर्यंत पुणे दरवाज्यापाशी पोहोचतात.
थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा खाली परत येतात. मागील वीस वर्षांपासून पाऊस, ऊन, वारा किंवा थंडी काहीही असो — त्यांनी ही वारी नेहमी बुधवार किंवा गुरुवारी केली आहे. इतर दिवशी ते दररोज वेताळ टेकडीवर मित्रांसोबत चालण्यासाठी जातात.
आजवरच्या प्रत्येक ट्रेकची नोंद, ट्रेकचा क्रमांक आणि सोबत कोण होते? अशी डायरीत नोंद करून ठेवण्याची त्यांची सवय आहे. जयंत महाराव, प्रदीप उपाध्ये, बाळासाहेब गिजरे, गणेश शिंदे, विनय बापट, विजय राजवाडे या मित्रमंडळीसोबत ते ‘जगात भारी, सिंहगड वारी’ हे घोषवाक्य म्हणत नियमित ट्रेक करतात.
'सध्या मला कोणताही आजार किंवा थकवा नाही. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मी तंदुरुस्त आहे. एक हजार वेळा सिंहगडावर चढाई केलेल्या ट्रेकर्समध्ये माझाही समावेश होईल, याचा मला आनंद आहे. नागरिकांनी दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यावा, असे माझे सर्वांना आवाहन आहे.'
- नंदकिशोर मुळीक, हौशी ट्रेकर
'मी २००६ पासून मुळीक यांच्यासोबत सिंहगडावर जातो. आमचा सात जणांचा ग्रुप आहे. मुळीक व्यावसायिक कामकाज सांभाळून आवडीने सिंहगडावर येतात. नियमित ट्रेकमुळे आमचे आरोग्य उत्तम आहे.'
- गणेश शिंदे, मुळीक यांचे मित्र / सहकारी