पर्यावरणपूरक विसर्जनाचा संकल्प
खाडीत विसर्जन होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण सहा टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी एकूण १७,९३९ गणपती व गौरी मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात १६ हजार ९४४ गणेशमूर्ती तर ९९५ गौरी मूर्ती होत्या. त्यात १२७ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचाही समावेश आहे. यामध्ये कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण ७० टक्के होते, तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण फक्त सहा टक्के राहिले. गेल्या वर्षी हे प्रमाण अनुक्रमे ५१ टक्के व ३८ टक्के होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीलाही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष टाकी व्यवस्था (हौद) यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा २० टक्के असून ते गतवर्षी आठ टक्के होते. तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा चार टक्के असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे.
कळवा प्रभाग समिती क्षेत्रात नागरिकांनी सुरुवातीला खाडीत विसर्जनाचा आग्रह धरला होता; मात्र महापालिका आणि पोलिस प्रशासनाने त्यांना विनंती केल्यावर येथील नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून सहकार्य केले. गजानननगर, बंदरपाडा येथे सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि प्रशांत फिरके, महापालिका कर्मचारी अशोक माधवी, नरेंद्र गवाते, भगवान पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर आणि पोलिस निरीक्षक पिंगुळे यांनी त्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे पारसिक घाटावर कोणीही मूर्ती नेली नाही, असेही मनीषा प्रधान यांनी सांगितले.
कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जाणार असल्याची माहितीही प्रधान यांनी दिली.
स्वीकार केंद्रात २६२ मूर्ती
पालिकेच्या एकूण १० ठिकाणी असलेल्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २६२ गणेशमूर्तींचे महापालिकेच्या वतीने स्वीकृती केंद्राच्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये विधिवत विसर्जन करण्यात आले.
१६ टन निर्माल्य दान
यंदा निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत. सातव्या दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १६ टनांहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच, निर्माल्यांतील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. दीड दिवसाच्या मूर्ती विसर्जनानंतर १५ टनाएवढे निर्माल्य जमा झाले. तर, पाचव्या दिवशी सहा टनाएवढे निर्माल्य जमा झाले आहे.
विसर्जनाची आकडेवारी
विर्सजन स्थळ गणेशमूर्तींची संख्या गतवर्षीची संख्या
कृत्रिम तलाव (२४) १२,५९७ ७,३९०
विशेष हौद (टाकी) व्यवस्था (७७) ३,६६६ १,१४९
खाडी विसर्जन घाट (९) १,३६६ ५,५२९
फिरती विसर्जन व्यवस्था (१५) ४८ ७२
मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) २६२ २५९
एकूण - १७,९३९ १४,३९९
एकूण गौरी मूर्ती - ९९५
सार्वजनिक गणेशमूर्ती - १२७