खोपटा पुलावर धोकादायक प्रवास
मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; रस्ता दुरुस्तीची मागणी
उरण, ता. ३ (वार्ताहर) : उरण तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागाची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या खोपटा पुलावर सध्या सर्वाधिक खड्डे असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच या मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शिवाय शालेय विद्यार्थ्यांनादेखील या मार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
खोपटा पूल पूर्व आणि पश्चिम विभागांना जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. जेएनपीएच्या माध्यमातून परिसरात मोठ्या विकास प्रकल्पांची उभारणी झाली असून, पूर्व भागाचा विकास वेगाने सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर सीएफएस कंटेनर यार्ड तयार झाले आहे. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा ठरत असून, पूर्व विभागातील नागरिकांसाठी लाइफलाइन म्हणून त्याकडे पाहिले जाते.
मात्र वाढत्या प्रकल्पांमुळे वाहतुकीत झपाट्याने वाढ झाली आहे. वाढत्या वाहनांच्या भारामुळे पुलावर मोठ्या खड्ड्यांची निर्मिती झाली आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. याशिवाय खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने पुलाची संरचना कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या खड्ड्यांची चोख देखभाल केली नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो. मनसेने पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. दरम्यान, केवळ तात्पुरती उपाययोजना केली जाते. मोठ्या अवजड वाहनांचा सततचा ओघ असल्यामुळे खड्डे पुन्हा तयार होतात, असे स्थानिक नागरिक तसेच मनसे तालुकाप्रमुख सत्यवान भगत यांनी सांगितले.
................
या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जर विभागाने पुलाची नियमित आणि चोख देखभाल केली असती तर वाहतुकीच्या या धोकादायक परिस्थितीला प्रतिबंध करता आला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. खोपटा पुलाचा वापर मुख्यतः व्यावसायिक वाहतुकीसाठी होत असल्याने पुलाची संरचना धोक्यात येणे परिसराच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते. या समस्येचे निराकरण तातडीने झाल्यास पुलावर मोठा अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील खड्ड्यांवर प्रभावी उपाययोजना करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिकांकडून करण्यात येत आहे.