माणगावातून कोंडीमुक्त प्रवास
esakal September 04, 2025 07:45 PM

माणगावातून कोंडीमुक्त प्रवास
पोलिसांच्या नियोजनामुळे कोकणवासीयांना दिलासा
माणगाव, ता. ३ (बातमीदार)ः गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात मोठ्या संख्येने गेलेले गणेशभक्त परतीच्या प्रवासाला निघाले आहेत, पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, पण नेहमी कोंडी होणाऱ्या माणगावममध्ये मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोंडी झाली नसल्याने माणगाव पोलिसांच्या नियोजनाला यश आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या सत्रात वाहतूक सुरळीत सुरू होती, मात्र दुपारनंतर कोकणवासी खासगी वाहनाने गावी जाण्यास निघाले आहेत. माणगाव येथे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लावून वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव येथेच वाहतूक कोंडीचा सामना सध्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे, मात्र अवजड वाहतूक पोलिसांनी बंद केल्याने दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावले आहेत, तर माणगाव रेल्वेस्थानक ते ढालघर फाटा ठिकठिकाणी नाक्यावर पोलिस यंत्रणा तैनात आहे.
--------------------------------------------
काही मार्गांवर विघ्न कायम
माणगाव शहरातून मुंबई-गोवा महामार्गावर निजामपूर पुणे रोड, बामणोली रोड, मोर्बा रोड-दिघी पोर्ट तसेच कचेरी रोड लागून असल्याने गाड्यांना रस्त्यावर वळण घेताना वाहतूक कोंडी निर्माण होते. अशीच अवस्था कचेरी रोड, बामणोली रोडची आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.