संभाजीनगर रस्त्याच्या दुरुस्तीवरुन ग्रामस्थ आक्रमक
esakal September 04, 2025 07:45 PM

- rat३p१.jpg-
२५N८९१३६
संगमेश्वर ः रस्त्याची झालेली दुरवस्था.

संभाजीनगरातील रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक
निवेदने देऊनही दुर्लक्ष; निवडणुकीत उमटणार पडसाद
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवेदने, अर्ज करूनही कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सुमारे ५०० ते ६०० मीटर लांबीचा हा रस्ता आजही लाल मातीचा कच्चा रस्ता असून, त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात वाहून गेलेल्या दगडांमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, वाहनाने किंवा पायी जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण ठरत आहे. संभाजीनगरमध्ये ५००हून अधिक लोकसंख्या असून, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ५० ते ६० विद्यार्थी राहतात. या रस्त्याशिवाय पर्यायी मार्ग नसल्यामुळे शाळकरी मुले, विद्यार्थी, रुग्ण व वयोवृद्ध यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मते, प्रत्येक निवडणुकीच्यावेळी रस्ता होईल, अशी आश्वासने देण्यात येतात; मात्र गेल्या ५०-६० वर्षांत प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांनी परिस्थिती अधिक बिकट केली असून, गणेशमूर्ती विसर्जन करतानाही ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रस्ता पक्का करा तरच निवडणुकीत मतदान, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.