कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी महायुती सरकारचे मंत्री मोठ्या खुबीने निभावतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते राज्य कारभाराचा गाडा नेटाने हाकत असतात. राज्याचं कामकाज सांभाळतानाच दौरे, मीटिंग्स, सभा, भाषण, मुलाखती या सर्वांचा ताळमेळही हे तिन्ही नेते सांभाळत असतात. मात्र कामाच्या या व्यापात आपल्या कुटुंबाकडेही तितकंच लक्ष या नेत्यांचं असतं. त्यातच कधीकधी कामाच्या दरम्यानच कुटुंबाचे हसते खेळते असे क्षण समोर येतात की फक्त राजकारणी म्हणून नव्हे तर त्याहीपलीकडे जाऊन, पिता, आजोबा म्हणूनही या नेत्यांचं एक वेगळं रूप दिसतं.
असंच एक रूप नुकतंच दिसलं ते राज्याचे माजी मुख्यमंत्री, आणि सध्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांचं. गंभीर राजकारण आणि कुटुंब यांची सांगड घालातानाच, कामात असतानाही आपल्या नातवासाठी असलेलं त्यांच प्रेम क्षणात दिसलं.नातवंडं म्हणजे दुधावरची साय असते.. आजोबा-नातवाचं प्रेमळ नातं, क्यूट मोमेंट यावेळी दिसली आणि अनेकांना आवडलीही.
आजतक या वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडिटर साहिल जोशी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी आजोबा आणि नातवांचं बाँडिंग पाहायला मिळालं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गंभीर चर्चा सुरू असतानाच अचानक संपादक साहिल जोशी आणि एकनाथ शिंदे यांचा आवाज सोडून एक तिसराच आवाज ऐकायला यायला लागला. ‘बाबा-बाबा’ अशी हाक मारत शिंदेंच्या नातवाचा आवाज ऐकू येताच त्याचे आजोब एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर तर हास्य आलंच पण साहिल जोशी यांच्या ओठांवरही हसू फुललं.
अरे इथे काम चालू आहे ना…नातवाची हाक ऐकताच आजोबांच्या चेहऱ्यावर हसू
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारची बाजू सांगत एकनाथ शिंदे त्यांचे मुद्दे मांडत होते. आमचं सरकार सर्वांचं सरकार आहे. मराठा समाज मेनस्ट्रीममध्ये यायला पाहिजे… असं शिंदे बोलत असतानाच, बाबा, बाबा अशी हाक मारत त्यांच्या नातवाचा आवाज ऐकू येऊ लागला. तो ऐकताच शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्यांनी नातवाला थांबायचा इशारा केला. मात्र त्यांच्या नातवाच्या हाकांचा सपाटा सुरूच होता. थांब जरा, असं त्यांनी म्हणताच, तुम्ही इकडे या असा लाडिक हट्ट नातवाने केला. अरे इथे काम सुरू आहे , थांब की असं म्हणत शिंदेंनी यांनी साहिल जोशींशी चर्चा सुरू ठेवली. तुमच्या नातवाचा आवाज आमच्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचतोय अशी मिश्कील टिपण्णी जोशी यांनी केली आणि एकनाथ शिंदेही दिलखुलास हसले. कधी डोळे मोठे करत, कधी हसत, तर कधी हात जोडत एकनाथ शिंदे हे त्यांच्या नातवाला तिथून जायला सांगत होते. सर्वांनाच ही क्यूट मुव्हमेंट खूप आवडली. मुख्यमंत्री शिंदे आणि नातवाचा हा हलकाफुलका क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर झाला.