गंभीर मानसिक आजार -----लोगो
(२९ ऑगस्ट टुडे ४)
मानसिक आजार मग तो कोणताही असो, ते एक गंभीरच प्रकरण असतं असं सर्वांना वाटतं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मला कोर्टामध्ये एका घटस्फोटाच्या खटल्यामध्ये साक्षीसाठी बोलावणं आलं. घटस्फोटाला कारण म्हणून लग्नापूर्वीची माझी औषधाची चिठ्ठी जोडण्यात आली होती. माझ्याकडच्या नोंदी तपासल्या तेव्हा लक्षात आलं की, कॉलेजमध्ये असतांना परीक्षेच्या ताणामुळे डोकेदुखी झाल्यामुळे तिने माझ्याकडे उपचार घेतले होते. सांगायचं काय की, क्षुल्लक मानसिक आजाराला गंभीर समजल्याने मामला गंभीर बनला होता.
- rat४p१.jpg-
25N89382
- डॉ. शाश्वत शेरे, रत्नागिरी
---
मानसिक आजार समजून घेणे महत्वाचे
खरोखर गंभीर मानसिक आजार कोणते? त्याला काही उपाय असतात का? याचे उत्तर द्यायचे तर यातला सर्वात गंभीर मानसिक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. कधी कधी हा आजार उग्र स्वरूपात सुरू होतो. कानात कुणी बोलत असल्याचे आवाज येणे, संशय आणि विचित्र भ्रम होणे, आक्रमक वागणूक अशा प्रकारची लक्षणे दिसू लागल्यावर सर्वजण घाबरून जातात. हे काहीतरी बाहेरचं प्रकरण आहे, असं सांगणारे आजूबाजूला खूप लोक असतात. त्यावर उपाय म्हणून अनेक मांत्रिक, बुवा, महाराज यांच्याकडे चकरा सुरू होतात. त्यातून काही काळ लक्षणे कमी झाली तर रोग बरा झाला, असं समजलं जातं; पण हा रोगच असा आहे की, त्याची लक्षणं पुन्हा वाढायला लागतात. यात महत्वाचा वेळ वाया जातो. पैशांची बरबादी होते ती वेगळीच. यापेक्षा तातडीने मनोविकारतज्ज्ञांकडे जाऊन उपचार सुरू केले तर रोग लवकर आणि पूर्ण बरा होण्याची शक्यता वाढते.
काही वेळा हा आजार अगदी चोरपावलांनी येतो. बहुदा तरुण वयातच त्याला सुरुवात होते. सर्वांपासून अलिप्त रहाणे, निद्रानाश, अभ्यास किंवा काम याकडे दुर्लक्ष ही लक्षणे आळशीपणा, विक्षिप्त स्वभाव म्हणून दुर्लक्षित केली जातात आणि जेव्हा स्वत:शी पुटपुटणे, हसणे अशी लक्षणे सुरू होतात तेव्हा आजाराची कल्पना येते. यासाठी सतर्क राहून लवकरच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या आजारांमध्ये उपचार दीर्घकाळ व सातत्याने चालू ठेवावे लागतात. ही सर्व झोपेची औषधे आहेत, त्यांची सवय लागेल, त्यामुळे किडण्या बाद होतील असं सांगणारे अनेक लोकं भेटतात. त्यांचं ऐकून औषधे मध्येच बंद केली तर आजार पुन्हा बळावतो आणि असं अनेकवेळा झालं तर तो पूर्ण काबूत येणं अधिकाधिक कठीण होत जातं. त्यामुळे योग्य उपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरू ठेवणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर काहीतरी कामांमध्ये व्यग्र राहणे, घरातील वातावरण खेळीमेळीचे असणे, रुग्णाला टोचून न बोलणे या गोष्टी त्याचा हा गंभीर आजार नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असतात.
दुसरा गंभीर आजार म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर. यामध्ये रुग्ण भावनांच्या भरती-ओहोटीमध्ये हेलकावे खातो. कधी आनंदाचा अतिरेक तर कधी दु:खाचा. ही अवस्था काही महिने तर कधी कधी काही वर्षे राहू शकते. काहीजणांमध्ये या दोन्ही अवस्था एकानंतर दुसरी अशा प्रकारे येतात तर काहीजणांमध्ये एखादीच अवस्था प्रामुख्याने परत परत येते. आनंदाचा अतिरेक झाल्यावर झोप उडते, खूप फिरणे, खूप खर्च करणे, अखंड बडबड करणे, विरोध करणाऱ्यावर चिडणे, आक्रमक होणे अशी लक्षणे दिसतात तर दुःखाचा अतिरेक झाला तर आयुष्य नकोसे वाटणे, आत्मविश्वास गमावणे, काम, लोकांशी संपर्क टाळणे अशी लक्षणे दिसतात. औषधाने हा आजार चांगला बरा होतो; पण तो काही काळाने पुन्हा उद्भवू शकतो. उत्साह वाढवणारी औषधे दु:खातून बरे झाल्यावरही घेत राहिल्यास उन्मादाची अवस्था येऊ शकते आणि उन्मादाला कमी करणारी औषधे बरे झाल्यावरही घेत राहिल्यास नैराश्याची अवस्था येऊ शकते. यासाठी तज्ज्ञांची नियमित भेट घेऊन उपचार घेणे आवश्यक असते. ज्या रुग्णांमध्ये या दोन्ही अवस्था वारंवार येत असतील त्यांना भावना स्थिर राहण्यासाठी नियमित घेण्यासाठी औषधे दिली जातात.
याशिवाय अनेक गंभीर मानसिक आजार आहेत. या सर्वांमध्ये लवकर निदान, लवकर उपचार आणि सातत्याने उपचार या गोष्टी या आजारांचे गांभीर्य निश्चित कमी करू शकतात.
(लेखक रत्नागिरीतील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आहेत.)