भिवंडीत डाईंग कंपनीला भीषण आग
esakal September 08, 2025 02:45 PM

भिवंडीत डाइंग कंपनीला भीषण आग
कोट्यवधींचे नुकसान, जीवितहानी टळली

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात शुक्रवारी (ता. ५) रात्री १० वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. ‘बालाजी डाइंग’ या कपड्यांवर रंग प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला अचानक भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दोनमजली इमारत भक्षस्थानी पडली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर कच्चा कपडा, रंग प्रक्रिया करण्यासाठी लागणारी विविध रसायने आणि यंत्रसामग्री साठवलेली होती. त्यामुळे आगीने प्रचंड वेग घेतला. या आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

या दर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीतील कामगारांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडत काही प्रमाणात कच्चा कपडा वाचवण्यात यश मिळवले. मात्र संपूर्ण इमारत आणि त्यातील यंत्रणा, कच्चा माल, तयार उत्पादने आणि इतर साहित्य खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कंपनीत साठवलेले ज्वलनशील रसायन आणि उपकरणे यामुळे आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास सुरू असून, अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने यापुढे अशा कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.