Satej Patil and Malojiraje : सतेज पाटील, मालोजीराजे भाजपच्या स्वागत कक्षात, राजेश क्षीरसागरांना पाहून सतेज पाटील हात पुढे करत म्हणाले, काळजी घ्या...
esakal September 08, 2025 05:45 PM

Kolhapur Politics : आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे भाजप आणि आमदार क्षीरसागर यांच्या स्वागत कक्षात दिसले. एवढेच नव्हे तर आमदार राजेश क्षीरसागर यांना काळजी घेण्याचा सल्लाही आमदार पाटील यांनी दिला. निमित्त होतं सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीचे.

गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक म्हणजे राजकीय नेत्यांसाठी चर्चेची एक ठिकाण असते. कोण लेझीम खेळतो, झेंडा नाचवतो.. तर कॉन्ट्रॅक्टर चालवतो. येथे मंडळांची ईर्षा तर असतेच पण कार्यकर्तेही जल्लोषात असतात. यावर्षी मात्र आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी मिरवणुकीतील सर्व राजकीय पक्षांच्या स्वागत मंडपात स्वतः जाऊन मिरवणुकीतील तणाव राजकीय वातावरण यांना फाटा दिला.

मालोजीराजे यांनी पाटाकडील तालीम मंडळ येथे हात उंचावून नृत्य केले. पिवळा निळा झेंडा ही फडकविला. मधुरिमा राजे यांनी लेझीमचा फेर धरला. आमदार पाटील यांनी शहाजी तरुण मंडळ, बागल चौक तरुण मंडळ येथेही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ठेका धरला. पापाची तिकटी येथील महापालिकेच्या बुथवर रात्री अर्धा पाऊण तास थांबून मंडळाच्या अध्यक्षांना पान सुपारी श्रीफळ ही दिले. नंतर दोघेही सर्वपक्षीय स्वागत मंडपावर स्वतः गेले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना येण्याची विनंती केली. यावर आमदार पाटील यांनी तुम्ही मूळचे भाजप आहात मी नक्की येणार असे म्हणत त्यांच्याही स्वागत मंडपात भेट दिली. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याही शिवसेनेच्या मंडपात पोहोचले. गेली दोन दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या आमदार क्षीरसागर यांना तब्येतीची काळजी घेण्याचाही सल्ला आमदार पाटील यांनी दिला.

Jayant Patil, Satej Patil On CM Devendra Fadanvis राज्यातील नेत्यांना फडणवीसांबद्दल काय वाटतं? | Sakal News

या मंडपावर क्षीरसागर त्यांच्या पत्नी आणि कार्यकर्ते होते. राजकारणात नेहमी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणारे हे दोघे आज एकाच व्यासपीठावर आणि हस्तांदोलन करीत असताना अनेकांनी छायाचित्र आणि व्हिडिओ केले. मनसे, सह इतर स्वागत मंडपातही आमदार पाटील आणि मालोजीराजे पोहोचले. यावेळी त्यांनी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या स्वागत कक्षात जाणे मात्र टाळले. या संपूर्ण स्वागत भेटीची चर्चा मिरवणुकीत जोरदार होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.