भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : रस्ते अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रांचे (ब्लॅक स्पॉट) फलक लावण्यात आलेले असतात, परंतु बहुतांश वेळा या फलकांकडे चालकांचे लक्ष जात नाही. परिणामी रस्ते अपघात होतात. वाढते अपघात कमी करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आता ब्लॅक स्पॉट हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. याद्वारे वाहनचालकांना अपघातप्रवण क्षेत्रांची सूचना आगाऊ मिळणार आहे. या मोबाईल ॲपचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोमवारी (ता. ८) भाईंदर येथे उद्घाटन करण्यात आले.
शहरातील अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर ठरावीक ठिकाणी अपघाताची ठिकाणे असतात. काही धोकादायक वळणे असतात. या ठिकाणी अपघात होण्याची सर्वाधिक शक्यता असते. हे अपघात टाळता यावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग तसेच वाहतूक पोलिस यांच्याकडून संयुक्तरीत्या सर्वेक्षण करून अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित केली जातात आणि ती ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली जातात. वाहनचालकांना ही ठिकाणी नेमकी लक्षात यावीत, यासाठी अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे फलकही त्या ठिकाणी लावले जातात. ते ठिकाण येताच वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वेग कमी करणे अपेक्षित असते, जेणेकरून अपघात टाळता येऊ शकतील. मात्र बहुतांश वेळी वाहनचालकांचे या फलकांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे ते आपल्या वाहनांचा वेग कमी करीत नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते.
अपघातप्रवण क्षेत्रांचे फलक लावल्यानंतरही गेल्या काही काळात अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याचे लक्षात आल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आता ब्लॅक स्पॉट हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मिरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण या भागांतील सर्व अपघातप्रवण क्षेत्रे नमूद केली आहेत. वाहनचालकाने हे मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्याचे वाहन अपघातप्रवण क्षेत्रात यायच्या ५० मीटर आधी चालकाच्या मोबाईलवर अपघातप्रवण क्षेत्राची सूचना येणार आहे. त्यामुळे साहजिकच चालक सतर्क होऊन आपल्या वाहनाचा वेग कमी करेल. त्याचा परिणाम म्हणून अपघातांमध्ये घट होईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
दोषी वाहनचालकांच्या शोधासाठी ‘एआय’चा वापर
वाहनचालक अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर अथवा दंड भरीत नाहीत. अशा वाहनांचा शोध घेणे वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान असते, मात्र एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) मदतीने हे काम सोपे होणार आहे. यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने टोलनाके, फास्टॅग यंत्रणा, सीसीटीव्ही फुटेज आदीतून सर्व वाहनांची माहिती गोळा केली आहे. ही माहिती एआय प्रणालीला देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित वाहतूक पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी वाहनांचा शोध घेणे सोपे होणार आहे, अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली.