शिरूर, ता. ८ : येथे गणेश विसर्जनादिवशी ३९६ मूर्ती संकलित झाल्या. विसर्जन घाट तसेच रयत शाळेच्या मैदानावर उभारलेल्या कृत्रिम हौदात सुमारे ५०० मूर्तींचे विसर्जन केले. पॉलिमर इंडिया या कंपनीतील कामगारांनी निर्माल्य संकलनासाठी स्वयंसेवकाची भूमिका बजावली. यातून सुमारे तीन टन निर्माल्य जमा झाले.
येथील नगरपरिषद व वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या माध्यमातून विसर्जन घाटावर मूर्ती संकलन कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी मुख्याधिकारी प्रीतम पाटील, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा लंघे, सचिव उषा वाखारे, स्वच्छता निरीक्षक आदित्य बनकर, मनोज अहिरे आदींनी मूर्ती दानाचे आवाहन केले.
या आवाहनाला शिरूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच निर्माल्य संकलन उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरीकांना नगरपरिषदेच्या वतीने ‘पर्यावरण दूत’ प्रमाणपत्र देऊन पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून मूर्तींचे पावित्र्य राखा, मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करा, भारतीय हिंदू संस्कृतीचे रक्षण करा असे आवाहन केले जात होते. ‘देवाला दान करण्याइतपत आपण मोठे झालो आहोत का?’ असा सवाल अजिंक्य तारू, उमेश शेळके आदींनी केला.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, मुख्याधिकारी पाटील यांनी विसर्जन घाट परिसरात भेट देऊन संयम व शांतता राखण्याचे आवाहन केले.
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे डबे
आम्ही शिरूरकर फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत सकाळपासून बंदोबस्तावर असलेल्या ११० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे दिले. गेल्या १४ वर्षांपासून संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, राहुल निकुंभ, फैजल पठाण, फिरोज सिकलकर, आशुतोष मिसाळ, गोपीचंद पठारे, शिवाजी औटी आदींनी योगदान दिले.
महाप्रसादाचे वाटप
मनसेच्या वतीने, विसर्जन घाटावर उभारलेल्या कक्षातून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाच हजार कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, तालुका संघटक अविनाश घोगरे, ॲड. आदित्य मैड, रविराज लेंडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
विनामूल्य वाहन उपलब्ध
विसर्जनासाठी नगरपरिषद व तोफे होम फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून विनामूल्य वाहन उपलब्ध करून दिले होते. कलात्मक पद्धतीने सजविलेल्या या वाहनातून ३६० च्या आसपास मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरासह पंचक्रोशीतूनही या वाहनाला मागणी होती. नगरसेवक संदीप गायकवाड, संजय घेगडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.