गणेशोत्सवातून सामाजिक वीण घट्ट
esakal September 09, 2025 08:45 AM

- rat८p४.jpg-
P२५N९०१४७
चिंचघर ः २१ किमी लांब निघालेली कुणबी भवन राजाची मिरवणूक
- rat८p५.jpg-
P२५N९०१४८
चिंचघर ः कुणबी भवन राजाला निरोप देण्यासाठी भारजा नदीकिनारी जमलेला जनसमुदाय.
---
गणेशोत्सवातून सामाजिक वीण घट्ट
कुणबी भवन राजाचे विसर्जन; भारजेच्या तीरावर जनसमुदाय
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ : चिंचघर येथे भारजा नदीच्या तीरावर कुणबी भवनच्या राजाला निरोप देण्यासाठी जमलेला भक्तांचा जनसमुदाय, हा उत्सवातून सामाजिक वीण घट्ट झाल्याचे चित्र दाखविणारा ठरला आहे. मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाची ३८ वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अधोरेखित करणारी ठरली.
शहरातील कुणबी भवन येथील कुणबी सेवा संघाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा सामाजिक वीण घट्ट करणारा आहे. तालुक्यातील १०९ गावांच्या २३२ वाड्या, सामाजिक बांधिलकीच्या एका विचाराने जोडण्याचे काम कुणबी भवनच्या राजाने केले आहे. येथे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, विविध उपक्रम व पारंपरिक कलेच्या सादरीकरणातून कला जोपासण्यासोबत समाजप्रबोधन करण्याचा प्रवास निरंतर सुरू आहे. १९८६ साली कुणबी भवनची निर्मिती झाली. त्यांच्या दुसऱ्या वर्षी समाजनेते व माजी आमदार अॅड. जी. डी. सकपाळ आणि सुलभाताई सकपाळ या दाम्पत्याच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बारा दिवसांच्या सार्वजनिक उत्सवात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची रेलचेल असते. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्मांतील समाजबांधव उपस्थित राहतात.
तालुक्यातील गावोगावी जतन करून ठेवलेल्या जाखडी, भजन, कीर्तन, हरिपाठ, टिपरी नृत्य अशा विविध पारंपरिक कलांचा ठेवा कुणबी भवनच्या राजासमोर सादर करून समाजप्रबोधन केले जाते. उत्सवाचा खर्च तालुक्यातील समाजबांधव देणगी स्वरूपात उभा करतात. संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय सण, कुणबी भवन वर्धापन दिन, विद्यार्थी गुणगौरव, आर्थिक सहाय्य, समाजहिताची आंदोलने, वैद्यकीय सुविधा, महिला सक्षमीकरण, विविध विषयांवरील मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून बांधिलकी जपली जाते. तालुक्यातील हजारोंचा जनसमुदाय जोडला असून, उत्सवाला ‘कुणबी भवनचा राजा’ अशी बिरुदावली प्राप्त झाली आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी कुणबी सेवा संघ, महिला आघाडी, विचार मंच, क्रीडा असोसिएशन, दुर्गवाडी ग्रामस्थ, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेतात.
---
चौकट
२१ किलोमीटरची मिरवणूक
कुणबी भवनच्या राजाची मंडणगड ते चिंचघर ही २१ किलोमीटर लांबीची विसर्जन मिरवणूक जिल्ह्यात एकमेव असून, गणपतीला एकवीस नामावली आहेत आणि एकवीस दुर्वा, मोदक, वृक्षवल्लरी अत्यंत प्रिय आहेत. तालुक्यातील आबालवृद्धांना गणेशाचे दर्शन मिळावे म्हणून कुणबी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या राजाची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला चिंचघर येथील भारजा नदीच्या तीरावर नेण्यात आली. प्रवासादरम्यान येणाऱ्या गावागावांतून उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.