ड्युसलडॉर्फ : गणपती बाप्पाच्या आगमनाने जर्मनीतही उत्साहाचा माहोल आहे. यंदा ड्युसलडॉर्फमधल्या भालेराव कुटुंबाने आपल्या घरच्या बाप्पाला खास दाद द्यायची ठरवली आणि सजावट केली ती थेट ऑटो रिक्षाची!
घरच्या छोटेखानी मध्ये आरास उभारून त्यात रंगीबेरंगी लाईट्स, फुलांचे हार, सजावटीच्या वस्तूंनी नटवलेला ऑटो रिक्षा ठेवला. त्यातच बाप्पांची स्थापना झाल्यावर सगळं घरच उत्सवाच्या आनंदाने उजळून निघालं.
भारताबाहेर राहूनही ‘आपलासा’ वाटणारा हा ऑटो रिक्षा पाहून पाहुण्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मुलांनी तर रिक्षासोबत फोटो काढण्यात मजा घेतली. मोठ्यांना मात्र भारतातील रस्ते, सणाचा गजबजाट, आणि लाडक्या बाप्पाची आठवण झाली.
“प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करायचं असतं. यावेळी वाटलं की भारतातला सणाचा माहोल आपल्या घरीच आणू. म्हणून ही ऑटो रिक्षा सजावट केली,” असं डॉ प्रसाद भालेराव यांनी हसत सांगितलं.
गणेशोत्सव म्हणजे फक्त पूजा नाही तर आनंद, एकत्र येणं आणि संस्कृतीची ओळख जपणं – हे या सजावटीतून सगळ्यांना अगदी मनापासून जाणवलं.