पिंपळे सौदागर, ता. ७ ः पिंपळे सौदागर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, ढोल-ताश्यांचा निनादाच्या गोंगाटामध्ये दोन लहान मुले कुटुंबापासून दुरावली. पण, त्यांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसायला आणि त्यांना त्यांच्या सुरक्षित हक्काच्या कुशीत परत पोहोचवायला संवेदनशील पोलिस अधिकारी माणुसकीचे देवदूत ठरले.
पिंपळे सौदागरमध्ये शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष रंगला. विद्युत रोषणाई, डीजेच्या गोंगाटात थिरकणारी पावले आणि गर्जणारा ढोल-ताशांचा नाद चालू असताना घराजवळ मिरवणूक पाहायला बाहेर पडलेली तीन वर्षांचा आरव आणि नऊ वर्षाची त्याची मावस बहीण मानवी ही दोघे भावंडे गोंगाटाने घाबरली आणि गडबडीत घरचा रस्ता चुकली. छोटासा आरव आईसाठी हाका मारत रडत होता; तर मानवी घाबरून भेदरलेल्या अवस्थेत होती. गर्दीत ही भावंडे भरकटली असताना गणेश वाशिनकर नावाच्या तरुणाने त्यांच्या रडण्याकडे लक्ष दिले आणि पिंपळे सौदागर येथील पोलिसांशी संपर्क साधला. मुलांना पोलिस चौकीत आणल्यानंतर पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर, उपनिरीक्षक राजश्री पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथम मुलांची विचारपूस करत त्यांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. आरव याचा आक्रोश कोणाच्याही संवेदनशील मनाला पिळवटून टाकेल, असाच होता. त्याचवेळी नांदेकर यांनी स्वतः आरवला जवळ घेतले आणि जणू वडिलांप्रमाणे प्रेम देत त्याला शांत केले. राजश्री पाटील यांनी मानवीच्या भीतीला ओलावा देत तिला आपल्या लेकीसारखी समजूत घातली. एवढेच नव्हे तर मानवी आणि आरवला जवळच्या खेळण्यांच्या मेळ्यात थोडा वेळ फिरवून त्यांच्या गालांवर पुन्हा हास्य उमटले. पोलिस उपनिरीक्षक नवनाथ चाफाळे, उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते, श्रीकांत पाटील, वैभव थोरात यांनी सुद्धा मुलांच्या सुरक्षेसाठी सजगता दाखवली.
आईच्या कुशीत परत
आरव आणि मानवी हरविल्याचे लक्षात आल्यानंतर आरवची आई आरती राठोड घाबरलेल्या अवस्थेत सौदागर पोलिस चौकीत पोहोचल्या. आरवला पाहताच त्यांच्या मनात भावनांचा पूर उसळला. आईच्या कुशीत आरव शांत झोपल्यासारखा झाला; तर मानवीच्या डोळ्यांत दिलासा उतरला.
पालकांनी मुलांना घराच्या बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी खेळण्यास पाठवताना अधिक सतर्क राहावे आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे हे आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या खिशात संपर्कासाठी पत्ता किंवा मोबाईल क्रमांकाची चिठ्ठी ठेवावी. जेणेकरून कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदत होईल. समाजाने जबाबदार नागरिकत्वाचे भान ठेवून अशा प्रसंगात पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.
- अमोल नांदेकर, पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे
PMG25B02774