चाकण, ता. ४ : येथील चाकण- तळेगाव मार्गावर महाळुंगे (ता. खेड) गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यात पाणी साचलेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गाच्या कामाला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न नागरिक, विद्यार्थी यांनी उपस्थित केला आहे.
औद्योगीक वसाहतीतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांची अवस्था या खड्ड्यामुळे फारच बिकट झाली आहे हे भयानक वास्तव आहे. चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील व चाकण परिसरातील मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाहिजे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाही, असे नागरिक, वाहनचालकांचे म्हणणे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांची वर्दळ असते. चाकण- तळेगाव मार्गावर नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, चाकण राणूबाई मळा या गावच्या हद्दीत मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्याकडे कोणीच लक्ष देत नाही. खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.
चाकण तळेगाव शिक्रापूर हा मार्ग एमएसआयडीसीकडे हस्तांतरित झालेला आहे. यापूर्वी तो सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाकडे होता. एमएसआयडीसीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मार्गाची कामे होत नाहीत. मात्र, खड्डे बुजवायला कोणत्याही कंपन्या व इतर लोक येत नाहीत. त्यामुळे परिस्थिती जैसे थे आहे. ही परिस्थिती भयानक आहे, असे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिळवणे यांनी सांगितले.
चाकण- तळेगाव, चाकण शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनांना ये- जा करण्यास अडथळा होतो. दुचाकी चालकांचे अपघातही वाढलेले आहेत. त्यात अनेक कामगारांचे जीव जातात. ही वस्तुस्थिती आहे. याकडे संबंधित प्रशासनाने संबंधित रस्ते विभागाने लक्ष दिले पाहिजे. रस्त्यांची कामे केली पाहिजेत. काही खड्डे पोलिसांनी पुढाकार घेऊन बुजविले आहेत.
- प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
09228