न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजवणी करताना
esakal September 05, 2025 06:45 PM

तलावातील मूर्ती विसर्जनावरून वाद
नवी मुंबई महापालिकेच्या मनाई आदेशांवरून नाराजी
तुर्भे/जुईनगर, ता. ४ (बातमीदार): उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती नैसर्गिक तलावात विसर्जनास मनाई केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून केली जात असल्याने गणेशभक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
पीओपी मूर्ती बनवण्यावर आणि विक्री करण्यावर असलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे, मात्र मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम ठेवत सहा फुटांच्या आतील मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सर्व गणेश घाटांवर फलक लावले आहेत. तसेच तलावात मूर्ती विसर्जनास अटकाव केला जात असल्याने एकीकडे वादावादीचे प्रकार उद्भवत आहेत, तर दुसरीकडे पाण्यातील प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने तलाव व्हिजनअंतर्गत २३ तलावांतील गॅबियन वॉलची निर्मिती केली असताना विसर्जनाला मनाई करण्यावरून नाराजीचा सूर उमटत आहे.
-------------------------------------
मूर्ती विसर्जन करताना पाण्यातील होणारे प्रदूषण पाहता १२ वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तलाव व्हिजनअंतर्गत २३ तलावांत गॅबियन वॉल तयार केल्या आहेत. येथील गाळ नित्याने काढला जातो. त्यामुळे न्यायालयाला ही बाब पटवून दिली, तर तलावात मूर्ती विसर्जन शक्य होईल.
- शरद पाटील, समाजसेवक, तुर्भे गाव
-------------------------------------
पालिका प्रशासनाकडून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मोबाईल विसर्जन टॅंक आणि रिसायकलिंग यंत्रणा उभ्या करून परिसरातील गणेश मंडळे, घरगुती गणपती गणेशभक्तांना संबंधित नियमावलीबाबत जागृत करणे आवश्यक होते. विसर्जन करताना अडवणे अयोग्य आहे.
- जगदीश मढवी, रहिवासी, जुईनगर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.