पुणे : शहरातील जुन्या व धोकादायक वाड्यांना महापालिकेकडून वारंवार नोटीस बजावूनदेखील रहिवासी त्याच धोकादायक वाड्यांमध्ये वास्तव्य करत आहेत. काही वाडे अक्षरशः मोडकळीस आलेले असतानाही, त्यामध्ये वास्तव्य करून नागरिक स्वतःच्या व कुटुंबीयांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार शहरात सुरू आहे. विशेषतः महापालिकेकडून यासंबंधी पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागामध्ये जुन्या वाड्यांची संख्या लक्षणीय आहे. काही वाड्यांची देखभाल दुरुस्ती नियमितपणे होत असल्याने संबंधित वाडे अद्यापही सुस्थितीत आहेत. मात्र काही वाडे १०० वर्षांहून अधिक जुने झाले आहेत. संबंधित वाडे धोकादायक अवस्थेत असून तेथे वास्तव्य करणेदेखील जीवावर बेतण्यासारखे आहे.
जुन्या व जीर्ण झालेल्या वाड्यांचा काही भाग पावसाळ्यामध्ये कोसळण्याच्या घटना घडतात. वाड्यांचे लाकडी जिने, छतासह वाड्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड, लाकूड, माती कोसळते. संबंधित वाडे वास्तव्य करण्यास धोकादायक असल्याने महापालिका प्रशासनाकडून संबंधित वाड्याचे मालक, भाडेकरू यांना नोटीस बजावली जाते. त्यानंतरही वाड्यांचे मालक व भाडेकरू यांची कुटुंबे संबंधित वाड्यांमध्येच वास्तव्य करत असल्याची सद्यःस्थिती आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गणेश पेठेतील जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला. त्यावेळी वाड्यामध्ये अडकलेल्या १५ जणांची अग्निशामक दलाने सुटका केली. संबंधित वाड्यातील रहिवाशांना महापालिका प्रशासनाने दोनदा नोटीस बजावली होती. वाडे वास्तव्यासाठी धोकादायक असल्याची माहिती असूनही वाड्यांचे मालक, त्यामधील भाडेकरू अन्यत्र वास्तव्य करण्यास प्राधान्य देत नाहीत. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून संबंधित वाड्याचे मालक, भाडेकरू यांना वारंवार नोटीस बजावली जाते.
त्याकडे रहिवाशांकडून दुर्लक्ष केले जाते. शहरातील धोकादायक अवस्थेत (सी-वन) १५९ वाडे आहेत. त्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. वाड्यांच्या बाहेर संबंधित वाडे धोकादायक असल्याबाबतचे फलकही लावण्यात आलेले आहे. १५९ धोकादायक वाड्यांपैकी ९९ वाड्यांचा धोकादायक भाग उतरविण्यात आला आहे. उर्वरित ६० वाड्यांचे मालक, भाडेकरू यांच्याकडून विरोध दर्शविला जातो. यासंदर्भात महापालिकेकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडूनही कारवाईबाबत सहकार्य होत नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
Crime News : हे कसलं प्रेम? पत्नीने पतीच्या कानात विष घालून केली हत्या, युट्यूबवरून शिकली कसा करायचा मर्डर, नेमकं प्रकरण काय?धोकादायक वाड्यात वास्तव्य करू नये, यासंबंधी वारंवार नोटीस देऊनही वाड्याचे मालक, भाडेकरू यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांकडेही याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. नागरिक जीव धोक्यात घालून संबंधित वाड्यांमध्ये वास्तव्य करत आहेत.
- सुप्रिया वळसे, उपअभियंता, बांधकाम विभाग, महापालिका