पालिकेचे आठ जलतरण तलाव सार्वजनिक-खासगी भागीदारीने चालवणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापालिकेने आपले १३ पैकी आठ जलतरण तलाव सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा, वाढीव वेळ आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या योजनेत कांदिवलीतील एक ऑलिंपिक आकाराचा तलाव आणि वरळी, विक्रोळी, अंधेरी (पूर्व-पश्चिम), मालाड (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व-पश्चिम) येथील सात तलावांचा समावेश आहे. तलावांच्या सदस्यत्व शुल्कात कोणताही बदल होणार नाही. छोटे तलाव वार्षिक ९,२८३ तर ऑलिंपिक तलाव वार्षिक ११,७१० रुपये या दरानेच उपलब्ध राहतील, मात्र खासगी भागीदारांकडून सोयीसुविधा अद्ययावत करणे, तलावांची वेळ वाढवणे तसेच सोमवारीही तलाव खुले ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
महापालिकेवर सध्या दरवर्षी तलावांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. छोट्या तलावांवरच वार्षिक ७० लाखांपेक्षा जास्त खर्च येतो. खासगी भागीदारीमुळे हा आर्थिक भार कमी होणार आहे. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत गरीब विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रशिक्षण देण्याची अट खासगी भागीदारांवर घालण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी आर्थिक सल्लागार नेमण्याचे ठरवले असून, अभ्यास अहवालानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रयोग यशस्वी झाल्यास उर्वरित तलावही सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलवर देण्याबाबत विचार केला जाईल.