‘ऑपरेशन सिंदूर’ देखाव्याच्या माध्यमातून मांडली भारतीय जवानांची शौर्यगाथा
नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.४ : नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर देखावा सादर करून भारतीय जवानांची शौर्यगाथा मांडली आहे. १९६७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली असून, यंदाचे गणेशोत्सवाचे ५९ वे वर्ष आहे.
या मंडळातील तरुण, ज्येष्ठ नागरिक एकत्र येत विविध उपक्रम राबवितात. यामध्ये समाजप्रबोधनावर भर दिला जातो. मंडळाचे सल्लागार आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात विविध समाजोपयोगी कामे केली. आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर राबवण्यात येतो. गेले तीन वर्षे मंडळाकडून ‘एक वही, एक पेन’ उपक्रम राबवला जात आहे. जमा झालेले साहित्य शहापूर येथील स्वामी विवेकानंद आदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते.
नऊ मिनिटांचा दृकश्राव्य कार्यक्रम
‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर देखावा सादर करून समाजप्रबोधन करण्याचा मंडळाचा मानस आहे. देखाव्याची संकल्पना आमदार मंगेश कुडाळकरांची असून, नेपथ्यकार संदेश बेंद्रे सरंनी हा देखावा साकारला आहे. १० फूट उंचीची श्रींची मूर्ती पर्यावरणपूरक असून, कागदाच्या लगद्यापासून बनवली आहे.
समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करता यावे, समाजात एकोपा निर्माण करून प्रेमभावना आणि बंधुभाव वाढीस लागावा, गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यात यावा, हा आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सेवा करण्याचे आम्हाला बळ मिळो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.
- रोहन पाटील,
अध्यक्ष, नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ
नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने सामाजिक कार्याचा ध्यास घेतला आहे. विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. यंदा भारतीय जवानांची शौर्यगाथा मांडली आहे.
- गितेश माने,
मुख्य सचिव, नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ